नगरः पालकमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे या भाजपमधील दोन नेत्यांच्या संघर्षाचा नवा केंद्रबिंदू ठरलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शिर्डी येथील नियोजित शेतकरी मेळाव्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण पवार यांनी स्वीकारले. या घडामोडीतून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवानेते विवेक कोल्हे भविष्यात कोणती वाट पकडणार? याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील बदलत्या राजकारणाची ही नांदीही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नगर लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदार तथा पालकमंत्री विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे आता शिर्डी परिसरावर, विखे यांचे प्राबल्य असलेल्या या पारंपारिक परिसरावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. आता ते नगर मतदारसंघात, जिल्ह्याच्या दक्षिण भागात फारसे फिरताना दिसत नाहीत. गणेश कारखाना हातातून निसटल्यानंतर विखे यांना आता ही गरज भासत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना कुटुंबीयांच्या पारंपारिक मतदारसंघाकडे सुजय विखे लक्ष देऊ लागले आहेत.
हेही वाचा : कंत्राटी भरतीवरून टीकेची झोड, सुशिक्षित तरुणांचे शोषण थांबवण्याची विरोधी पक्षांची मागणी
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच लढती होणार आहेत. महायुती झाल्यानंतर राज्यातील इतर काही मतदारसंघाप्रमाणेच कोपरगावमध्येही तेढ निर्माण झाली आहे. तेथील विद्यमान आमदार आशुतोष काळे अजितदादा गटात तर पारंपारिक प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे भाजपमध्ये. महायुतीच्या जागा वाटपात कोपरगाव कळीचा मुद्दा ठरेल. विवेक कोल्हे सहकारातील दिग्गज नेते स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव तर आमदार काळे हे माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांचे नातू.
पूर्वी शंकरराव कोल्हे यांच्या वर्चस्वाखाली असलेला गणेश कारखाना कालांतराने विखे यांच्या अधिपत्याखाली आला. तो काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व भाजपचे कोल्हे यांनी एकत्र येऊन विखे यांच्या ताब्यातून हिसकावला. विखे यांना मतदारसंघातच धक्का बसला. त्यातून विखे-काळे जवळीक निर्माण झाली तर विखे-कोल्हे वाद विकोपाला गेला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला. भाजप नेते कोल्हे यांच्या पाठीशी होते, मात्र विखे गट वगळून.
हेही वाचा : छगन भुजबळ नेमके कोणाचे? मराठा समाजाच्या नाराजीमुळे राजकीय पक्षांना नकोसे झाल्याची चर्चा
महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री विखे गट किशोर दराडे यांच्या पाठीशी होता. कोल्हे यांच्या पराभावाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला. महायुतीत विद्यमान आमदार अजितदादा गटाचे. त्यातूनच विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीसाठी कोणती भूमिका घेणार असाही प्रश्न जिल्ह्यात उत्सुकताने विचारला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गणेश कारखान्यातील कोल्हे समर्थकांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीकडे लक्ष वेधले जात आहे.
अर्थात हीच परिस्थिती उलटी असती, तरी चित्र असेच दिसले असते, याबद्दल जिल्ह्यात दूमत नाही. गेल्या वेळच्या विजयाच्या आधारावर शरद पवार गट कोपरगावच्या जागेवर दावा सांगणार असले तरी या पक्षाकडे सध्यातरी सक्षम उमेदवार नाही. म्हणूनच युवानेते विवेक कोल्हे कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष राहणार आहे. शिवाय कोल्हे यांच्यापुढे पर्याय तरी कोणता शिल्लक आहे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.