मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरः. राज्यातील बदलत्या समीकरणांचा परिणाम लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघात जाणवू लागला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ज्या लढतीची शक्यता व्यक्त केली जात होती, मतदारांनी ज्या संभाव्य लढतीची अटकळ बांधली होती, त्या लढतीत आता बदल होईल, असे वातावरण राज्यातील घडामोडीनंतर निर्माण होत आहे. त्यातूनच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी चेहरा कोणाचा असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या तरी भाजपच्या आणि विखे यांच्या विरोधकांना अशा सक्षम प्रतिस्पर्धी चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या आणि त्यांच्या युती-आघाडीच्या पातळीवर सुरू केली आहे. मुळात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार पुन्हा सुजय विखे हेच असतील या गृहीतकाला पक्षातूनच छेद देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मनसुबा जाहीर करुन या गृहीतकाला तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. या मनसुब्याने विखे यांच्या वक्तव्यात बदल घडवला आहे. आता सुजय विखे पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस जो उमेदवार देतील त्याचा प्रचार करु, अशी भाषा करु लागले आहेत. त्यामुळे प्रथम राम शिंदे यांच्यावर मात करत पुन्हा एकदा उमेदवारी मिळवणे हे सुजय विखे यांच्या पुढील आव्हान असणार आहे. याशिवाय भाजपमधील निष्ठावंत गटाने विखे पितापुत्रांविरुध्द जो असंतोष व्यक्त केला आहे, तो अडथळाही त्यांना पार करावा लागणार आहे. विखे यांना पहिली लढाई स्वपक्षीयांविरुध्दच लढाई लढावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना मैदानात उतरावे लागणार आहे, असे दिसते.

हेही वाचा… पावसाची दडी आणि सांगलीत पाण्यावरून नेतेमंडळींची कुरघोडी

गेल्या महिन्यापर्यंत विखे यांच्या विरोधातील उमेदवार कोण असेल याचे चित्र जवळपास निश्चित होत आले होते. राज्यातील घडामोडींनी त्यात आता बदल घडवला आहे. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमेदवारीची चाचपणी केली होती. नगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यातील शिर्डी मतदारसंघ राखीव आहे. नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने लढवला होता. एकत्रित राष्ट्रवादीच्या चाचपणीतून या मतदारसंघात आमदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली होती. यातील आमदार लंके यांनी उमेदवारीच्या दृष्टीने दौरे, आंदोलनाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू केली होती. याशिवाय इतरही काही नावांची चर्चा झाली होती, मात्र ती सर्व नावे दुसऱ्या फळीतील होती.

हेही वाचा… विरोधकांची बैठक यशस्वी, आघाडीला मिळाले नवे नाव, आता ‘एनडीए विरुद्ध भारत’ लढा!

राज्याच्या सत्ता समीकरणात झालेल्या बदलानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ६ पैकी ४ आमदार अजितदादा गटाकडे गेले आहेत. त्यामध्ये आमदार लंके व आमदार जगताप या संभाव्य उमेदवारांचाही समावेश आहे. यातील आमदार लंके हे भाजप खासदार विखे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखला जात तर आमदार जगताप यांचे विखे यांच्याशी राजकीय मैत्री आहे. शरद पवार गटाच्या यादीतून हे दोन्ही संभाव्य नावे आता वगळली गेल्याने थोरल्या पवार गटाकडे सक्षम उमेदवारीचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा… विधान परिषद बंडखोरांवर कारवाईसाठी पुन्हा न्यायालयीन लढाईचाच मार्ग?

राज्यातील घडामोडींपूर्वी आणखी एका चर्चेने जोर धरला होता. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला सातत्याने पराभव स्वीकारावा लागत असल्याने ही जागा महाविकास आघाडीतील काँग्रेसला देण्याची व ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी केली होती. संगमनेर हा थोरात यांचा हक्काचा विधानसभा मतदारसंघ. तेथे आता थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री सक्रिय झाल्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात यांच्या वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यातूनच थोरात यांनी नगर दक्षिणमधून उमेदवारी करावी अशी चर्चा सुरू झाली आहे. थोरात यांनी अद्याप त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. याशिवाय श्रीगोंद्यातील साखर कारखानदार अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. ‘मविआ’तील शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे नगर दक्षिणमध्ये सक्षम उमेदवारीची वाणवाच जाणवते.

हेही वाचा… “काँग्रेसला पंतप्रधानपदात स्वारस्य नाही”, मल्लिकार्जुन खरगे यांचे मोठे विधान!

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडे आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, वृद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे असे काही शिलेदार राहीले आहेत. मात्र त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सध्याचे हे चित्र पाहता त्यातूनच भाजपचे खासदार विखे यांच्या विरोधातील सक्षम प्रतिस्पर्धी चेहरा कोणता असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ahmednagar district political equations have changed now who is the rival in front of sujay vikhe patil print politics news asj
Show comments