नगरः लोकसभा निवडणुकीचे वेध लागण्यास सुरुवात झाली तेव्हा नगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावेळचे एकतर्फी वातावरण आता बदलून गेले आहे. निलेश लंके यांनी आमदार पदाचा राजीनामा देत शरद पवार गटाकडून जाहीर केलेल्या उमेदवारीने निवडणूक चुरशीचे होण्याचे संकेत दिले आहेत. पवार यांना लंके यांनी पूर्वीच उमेदवारीचा शब्द दिला होता. मतदारसंघातील विखे विरोध लंके याच्या पाठीमागे कसा आणि किती प्रमाणात एकवटला जातो, यावर निवडणुकीची चित्र अवलंबून राहील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक जरी विखे विरुद्ध लंके अशी होणार असली तरी ती अप्रत्यक्षपणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार अशीच रंगण्याची अधिक शक्यता आहे. लंके राज्यातील महायुतीच्या सत्तेचा लाभ मिळेपर्यंत अजितदादा गटाबरोबर राहणार हे काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट झाले होते. लोकसभेची तयारी त्यांनी पूर्वीच सुरु केली होती. पक्ष फूटीपूर्वी शरद पवार यांनीही त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. मधल्या कालावधीचा उपयोग लंके यांनी वातावरण निर्मितीसाठी करुन घेतला.

हेही वाचा : चावडी: बाळासाहेब भवन की ?

खासदार सुजय विखे यांची कार्यपद्धत ओळखून नीलेश लंके यांनी सामान्य फाटका कार्यकर्ता, कोणालाही सहज संपर्क होणारा आमदार अशी प्रतिमा निर्माण करण्यावर भर दिला. तोच निवडणूक प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरू पहात आहे. त्याविरुद्ध विखे यांची थेट गावपातळीवरील प्रचारयंत्रणा, बाळासाहेब विखे यांच्यापासून नाळ जुळलेले कार्यकर्ते, साधनसामुग्रीचा बलाढ्यपणा अशी यंत्रणा आहे. विखे पितापुत्रांच्या कार्यपध्दतीवरुन भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पुन्हा एकदा विखे व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये तडजोडीचा प्रयत्न केला. त्यानंतरही आमदार शिंदे यांचा नाराजीचा सूर आळवलाच. त्यामुळे शिंदे यांच्या निवडणुकीतील भूमिकेकडे लक्ष राहील. अर्थात विखे यांची यंत्रणा भाजपवर फारशी अवलंबून नाही, हेही तितकेच खरे.

विखे कोणत्याही पक्षात असोत, निवडणूक सार्वत्रिक असो की सहकारातील, विखे विरुद्ध इतर सारे हे चित्र नेहमीच असते. परंतु यंदा विखेविरोध अधिक संघटीत झाला आहे. मतदारसंघातील सात आमदारांपैकी तीन भाजप व एक अजितदादा गट असे चौघे विखे यांच्या पारड्यातील तर उर्वरित तिघे शरद पवार गटाचे आहेत. त्यातील एक रोहित पवार जिल्ह्यात फारसे लक्ष घालत नाहीत. पवार गटात स्वतःचे राज्य पातळीवरील नेतृत्व प्रस्थापित करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे.

हेही वाचा : मोले घातले लढाया: उमेदवारी वादात

सुजय विखे राष्ट्रवादीत शरद पवार यांनी संधी नाकारल्याने काँग्रेसमधून गेल्या निवडणुकीत भाजपवासी झाले तसेच नीलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर राष्ट्रवादीत आणि नंतर शरद पवार गट, अजितदादा गट व पुन्हा पवार गट असा प्रवास करणारे झाले आहेत. फरक एवढाच की विखे व भाजपमधील निष्ठावंत परस्परांपासून अंतर ठेवून आहेत तर सक्षम उमेदवारच नसल्याने पवार गट लंके यांना स्वीकारण्यास राजी आहे. विखे-शिंदे याच्यासारखा विकोपाला गेलेला नसला तरी रोहित पवार-नीलेश लंके असा सुप्त वाद आहेच.

हेही वाचा : केजरीवालांच्या विरोधात माफीचा साक्षीदार झाला, भाजपाच्या मित्रपक्षानं कुटुंबियाला दिली उमेदवारी

अप्रत्यक्ष विखे-पवार लढत

जिल्ह्यात विखे-पवार यांच्यात वेळोवेळीच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक लढाया रंगल्या. विखे-गडाख निवडणूक खटला हे त्याचे धगधगते उदाहरण. लंके यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी करण्याचे निश्चित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लंके यांना निवडणूक लढवण्यासाठी हवा भरली जात आहे, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याचे विधान केले होते. शिवाय विखे यांच्याविरोधात शरद पवार यांनी लंके यांचे नाव पक्ष फुटीपूर्वीच निश्चित केले होते. ही पार्श्वभूमी पाहता नगरची निवडणूक विखे विरुद्ध पवार अशीही रंगण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ahmednagar lok sabha election bjp s dr sujay vikhe patil is challenged by nilesh lanke sharad pawar print politics news css