नगरः महाविकास आघाडीमध्ये जिल्ह्यात नगर शहर, श्रीगोंदे व पारनेर या तीन मतदारसंघाच्या वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. तिन्ही पक्ष या तीन जागांसाठी आग्रही आहेत. त्यातूनच बंडखोरीची भाषाही सुरू झाली आहे. या तीन जागा कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे. चाचपणीसाठी नेत्यांचे दौरे होतात, प्रत्येक नेता आपल्या पक्षातील इच्छुकाला आश्वस्त करुन जातो. त्यानंतर लगेच मित्र पक्षातील इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे धाव घेत जागेची आग्रही मागणी करतात. गेल्या काही दिवसांपासून हा खेळ सुरू आहे.
या तिन्ही जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेसह ( ठाकरे), काँग्रेस इच्छुकांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या लागोपाठ भेटी घेण्याचा धडाका लावला आहे. या जागांच्या मागणीसाठी स्वपक्षीय श्रेष्ठींपेक्षा पवारांची मनधरणी करण्याकडे मित्रपक्षातील इच्छुकांचा कल अधिक निदर्शनास येतो. काँग्रेस आणि ठाकरे गटाने पवार यांच्या तीन-तिनदा भेटी घेतल्या.
नगर शहरचे आमदार संग्राम जगताप एकत्रित राष्ट्रवादीकडून गेल्यावेळी निवडून आले. फूटीनंतर ते अजितदादा गटाकडे गेले. शरद पवारांकडे शहरात सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेतील ( ठाकरे) इच्छुक या जागेसाठी आग्रही झाले आहेत. भाजपशी युती असताना शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी शहरावर तब्बल २५ वर्षे राज्य केले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असले तरी, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचे शहरातील मताधिक्य निम्म्यावर आल्याने शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेस यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्यावेळी श्रीगोंद्यातून लढलेले शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यंदा नगर शहरातून तर गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले किरण काळे यंदा काँग्रेसकडून दावेदार झाले आहेत.
पारनेरच्या जागेवर गेल्यावेळी नीलेश लंके राष्ट्रवादीकडून निवडून आले. आता ते खासदार झाले. ते पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. मात्र शिवसेनेचे (ठाकरे) कार्यकर्ते या जागेसाठी आग्रही आहेत. लंके यांनी गेल्या निवडणुकीवेळी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. त्याचवेळी उमेदवारीसाठी आग्रही असलेले जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी यंदा बंडखोरीची भाषा सुरू केली आहे.
हेही वाचा : राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?
श्रीगोंद्यात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. तेच शेलार यंदा काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मात्र तेथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपनेते साजन पाचपुते यांना आश्वस्त केले आहे. प्रकृती अस्वास्थ्याने यंदा भाजपचे आमदार बबनराव पाचपुते उमेदवार असतील का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.