नगरः गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या विरोधात आपण काम केले, यंदा त्याचेच काम करण्याचा प्रसंग नगर व शिर्डी या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख नेत्यांवर गुदरला आहे. मागील वैरभाव विसरून, गेल्या वेळचा प्रतिस्पर्धी यंदा विजयी होण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे हे अद्भुत चित्र यंदा नगर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.
हा विरोधाभास केवळ एवढ्याच पुरता मर्यादित नाहीतर आपापल्या विधानसभा मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीसाठी मताधिक्याचे आव्हान स्वीकारताना त्याचे श्रेय आपल्यालाच मिळावे, आगामी विधानसभा निवडणुकीतील संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवाराला मिळू नये, याचीही काळजी आजी-माजी आमदारांकडून घेतली जात आहे.
हेही वाचा – १७ जागा, एकाच जातीचे उमेदवार विजयी; दशकभराहून अधिक काळ प्रचलित जातीय गणित आहे तरी काय?
गेल्या निवडणुकीत नगर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांच्यामध्ये थेट लढत झाली होती व विखे विजयी झाले. गेल्या पाच वर्षांतील घडामोडींनी महाराष्ट्रातील राजकारण पूर्ण बदलून गेले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अजितदादा गट राज्यातील सत्तेत भाजपसमवेत सहभागी झाला, अजितदादा गटात नगरचे आमदार संग्राम जगताप सहभागी झाले. ते महायुतीत येण्यापूर्वीच सुजय विखे यांची आणि जगताप यांची शहरात युती झाली होती. त्यासाठी मध्यस्थी होती जगताप यांचे सासरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची. विखे महायुतीचे उमेदवार असल्याने जगताप त्यांच्या प्रचारात हिरिरीने सहभागी आहेत. काहींना ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी झालेले साटेलोटे वाटते. विखे मात्र हा जगताप यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सांगतात तर जगताप राष्ट्रवादीच्या त्यावेळच्या नेतृत्वामुळे आपल्याला लोकसभा निवडणूक लढवणे भाग पडल्याचा दावा करतात.
शिर्डी मतदारसंघात गेल्या सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विरुद्ध काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यामध्ये थेट लढत झाली. त्यात कांबळे यांचा पराभव झाला तर लोखंडे विजयी झाले. नंतर लोखंडे शिंदे गटात सहभागी झाले तर कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करुन श्रीरामपूर विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला व अलिकडेच ते लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या आशेने शिंदे गटात प्रवेश करते झाले. परंतु शिर्डीची उमेदवारी पुन्हा लोखंडे यांनी मिळवली. आता सहकारी झालेले कांबळे हे लोखंडे यांच्या प्रचारार्थ सक्रिय आहेत.
हेही वाचा – काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?
विधानसभेच्या इच्छुकांमधील भिती
यापूर्वीच्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजप विरुद्ध एकत्रित राष्ट्रवादी अशीच प्रमुख लढत झाली. त्यावेळचे प्रतिस्पर्धी महायुतीमुळे आता एकत्र आले. राष्ट्रवादीने (अजितदादा गट-ग्रामीण) काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार विखे यांच्या प्रचारार्थ नगरमध्ये मेळावा घेतला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, श्रीगोंद्यातील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वेगळीच भीती व्यक्त केली. या दोघांच्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. आम्ही जीवाचे रान करून विखे यांना मताधिक्य मिळवून देणार आणि त्याची ‘पावती’ मात्र भाजप आमदारांच्या नावाने फाडली जाणार, अते मत त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले.