प्रकाश टाळककर
अकोले : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी सरळसरळ काँग्रेसला आव्हान देत भाजपशी जवळीक साधली असतानाच नगर जिल्ह्यातील अमृतसागर सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील भाजपपुरस्कृत शेतकरी विकास मंडळाने दणदणीत विजय संपादित केल्याने नगर जिल्ह्यात भाजपसाठी या दोन्ही राजकीय घडामोडी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.
अलीकडेच झालेल्या अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत पिचड पितापुत्रांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला होता. महाविकास आघाडीने माजी मंत्री पिचड यांची कारखान्यातील ३० वर्षांची सत्ता संपुष्टात आणली. आताही माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडे असणारा तालुका दूध संघ ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले होते. त्यामुळेच मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या पदरी दारुण अपयश आले. अमृतसागर दूध संघ ही अगस्ती कारखान्यानंतरची दुसरी महत्वाची सहकारी संस्था मानली जाते. त्यामुळे दूध संघावर मिळालेली सत्ता ही पिचड व भाजप समर्थकांना दिलासा देणारी ठरणार आहे.
हेही वाचा… भाजपच्या चालीने काँग्रेस नेत्यांवर खुलासे करण्याची आली वेळ
माजी आमदार वैभव पिचड यांच्या दृष्टीने ही निवडणूक एका अर्थाने राजकीय अस्तित्वाची लढाई होती. दूध संघ त्यांच्याच ताब्यात असला तरी तीन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर दूध संघाचे बहुसंख्य संचालक त्यांना सोडून गेले होते. अगस्ती कारखान्यात पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या विपरीत परिस्थितीने खचून न जाता नव्या चेहऱ्यांना संधी देत त्यांनी ही निवडणूक जिद्दीने लढविली. पाच वर्षे त्यांनी दूध कार्यक्षमतेने चालविला होता.
हेही वाचा… उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला
दुसरीकडे महाविकास आघाडीत अगस्ती कारखाना निवडणुकीसारखी जिद्द या वेळी दिसत नव्हती. अंतर्गत मतभेदही होते. या सर्वांचा परिणाम पिचड यांच्या एकतर्फी विजयात झाला. १५ पैकी १३ संचालक त्यांच्या गटाचे निवडून आले. महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले. लागोपाठच्या काही पराभवानंतर मिळालेला हा विजय पिचड गटाला दिलासा देणारा आहे.
हेही वाचा… मुंबई महानगरपालिकेची सत्ता काबीज करणे भाजप आणि शिंदे गटाला सोपे आहे का?
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे मार्गदर्शन असले तरी या निवडणुकीची सर्व सूत्रे वैभव पिचड हालवत होते. अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत झालेला पराभव, त्या पाठोपाठ राजूर या स्वतःच्या गावात गमवावी लागलेली ग्रामपंचायत यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या होत्या. त्यांच्या समर्थकांमध्येही काहीसे निराशेचे वातावरण पसरू लागले होते. मात्र दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धूळ चारत त्यांनी एकतर्फी विजय मिळवीत आपले नेतृत्वगुण दाखवून दिले. या विजयामुळे पिचड समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम आगामी बाजार समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ते आता आत्मविश्वासाने सामोरे जातील.
महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद या निवडणुकीत समोर आले. ही निवडणूक बिनविरोध करावी असे काहींचे म्हणणे होते. मात्र आमदार डॉ. लहामटे यांनी बिनविरोधच्या प्रस्तावाला विरोध केला. निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. पतसंस्था आणि विरोधी गटाचे पुढारी यांच्यामागे चौकशांचा सासेमिरा लावून देण्यात आला आहे. त्यातून त्यांचे नितिधैर्याचे खच्चीकरण होत गेले. काहींनी माघार घेतली, काहींनी हातपाय गाळले, काही शरण गेले. निवडणुकीचा कौल त्यावेळीच स्पष्ट झाला होता.
हेही वाचा… “न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, पण…”, कपिल सिब्बल यांचं टीकास्त्र
मागील पाच वर्षे वैभव पिचड यांनी दूध संघाचा कारभार तुलनेने चांगला चालविला. संघ कर्जमुक्त केला. दुधउत्पादकांना दरवर्षी चांगला भाव व रिबेट दिला. करोनाकाळ असो की लम्पीचा प्रादुर्भाव दूध उत्पादकांना दिलासा देणारी धोरणे राबविली. विरोधी गटाची मतेही त्यांना चांगल्या संख्येने मिळाली. आता खाजगीकरणाच्या स्पर्धेत दूध संघ उर्जितावस्थेला आणण्याचे आव्हान त्यांचे पुढे आहे.