Akola Washim Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला, वाशीम जिल्ह्यातील आठ मतदारसंघात लढतीचे चित्र अस्पष्ट आहे. निवडक मतदारसंघात भाजप, वंचितचे उमेदवार जाहीर झाले असले तरी प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. महायुती, महाआघाडीसह वंचितकडून अनेक मतदारसंघात उमेदवार देणे बाकी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोला जिल्ह्यात पाच, तर वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात भाजप चार व युतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची एक जागा निवडून आली होती. वाशीम जिल्ह्यात भाजप दोन, काँग्रेस एका जागेवर विजयी झाली होती. पाच वर्षांमध्ये बरेच राजकीय समीकरण बदलले आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये वंचितचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता आहे. भाजपने पहिल्या यादीत केवळ अकोला पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांचे नाव जाहीर केले. आघाडीमध्ये हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे असतांना आता मविआमध्ये शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. शिवसेनेने गोपाल दातकर यांना उमेदवारी दिली. अकोला पूर्वत वंचित आघाडीची मोठी मतपेढी आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी सामना होणार असून वंचित कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : Priyanka Gandhi : आधी राहुल गांधी, आता प्रियांका गांधी; काँग्रेससाठी वायनाड कसा झाला बालेकिल्ला?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघात वंचितने मोठा डाव टाकत काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दिन खतीब यांना पक्षप्रवेश देऊन निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे मविआला बाळापूरमध्ये मोठा धक्का बसला. आता शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देत पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली. बाळापूरमध्ये महायुती काय निर्णय घेते, याकडे लक्ष असून येथे देखील तिहेरी लढतीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अकोट, मूर्तिजापूर व वाशीम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असतांना पहिल्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले नाही. अकोटचे प्रकाश भारसाकळे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीम मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे व वाशीमचे लखन मलिक हे अनेक वर्षांपासून विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. तरीही पक्षाने पहिल्या यादीत त्यांच्यावर विश्वास दाखवलेला नाही. या तिन्ही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत आमदारांविषयी तीव्र नाराजी आहे. उमेदवार बदलण्याची मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. अनेकांची लढण्याची इच्छा देखील व्यक्त केली. काँग्रेसची यादी देखील येणे बाकी असल्याने रिसोडचे विद्यमान आमदार अमित झनक हे प्रतिक्षेत आहेत. विद्यमान आमदारांविषयी पक्षांतर्गत नाराजी, इच्छुकांची गर्दी लक्षात राजकीय पक्षांनी सावत्र पवित्रा घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
हेही वाचा : विजय नहाटांच्या बंडखोरीमुळे शिंदे गट अवाक
इच्छुकांचा जीव टांगणीला
उमेदवार यादीकडे लक्ष लागून असलेल्या विद्यमान आमदारांसह इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. महायुती, मविआ व वंचितच्या उमेदवारांची माळ कुणाच्या गळ्यात पडते, यावर राजकीय समीकरण ठरणार आहेत.