अलिबाग: राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली असतांनाच, रायगड जिल्ह्यात मात्र महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. तर आता अलिबाग मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमधे नेते एकमेकांविरोधात तोंडसूख घ्यायला लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीतील समन्वय वाढवण्यासाठी राज्यभरात तिन्ही पक्षांच्या एका समितीचे गठन करण्यात आले आहे. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपआपसातील मतभेद मिटवून, समन्वय वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या समितीची बैठक सुरू असतांनाच रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद उफाळून आला आहे. अलिबाग मतदारसंघातील भाजपच्या दिलीप भोईर यांच्या वाढत्या राजकीय महत्वाकांक्षा यास कारणीभूत ठरल्या आहेत.

हेही वाचा :  लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

शेकाप मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या दिलीप भोईर यांनी गेल्या दोन वर्षाच पक्षात आणि मतदारसंघात स्वताचे स्थान निर्माण केले. आता अलिबाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पक्षाकडे तशी इच्छा त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. दिलीप भोईर यांची ही वाढती महत्वाकांक्षा शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरत आहेत.

दिलीप भोईर यांनी माकडचाळे थांबवावेत, महायुतीचा धर्मपाळून काम करावे, अन्यथा शिवसेनाही पेण विधासभा मतदारसंघातून उमेदवार उभा करेल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला. या टीकेला दिलीप भोईर यांनी प्रतिउत्तर दिले. आमचा पक्ष वाढवायचे काम आम्ही करत आहोत. आम्हाला डिवचू नका असे नाहीतर तुमची अंडीपिल्ली बाहेर काढू म्हणत जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यावर सडकून टिका केली. तुमचा पक्ष वाढवण्यास आमची हरकत नाही. पण मतदारसंघात शेकापची दुसरी टीम म्हणून काम करू नका, असे म्हणत राजा केणी यांनी भोईर यांना पुन्हा डिवचले.

हेही वाचा :  भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या वाकयुध्दामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातील संबध ताणले गेले आहेत. हा वाद आता विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. आधीच कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये वाद उफाळून आला आहे. आता अलिबाग मध्येही महायुतीत वादाला तोंड फुटल्याने महायुतीतील घटक पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag dispute within mahayuti s shivsena and bjp print politics news css