मोहन अटाळकर
अचलपूर येथे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केल्याने सत्तारढ आघाडीतील दोन आमदार आमने सामने आले आहेत. मंत्रीपदाची स्पर्धा, स्वपक्षीय संघटनात्मक बांधणीची चढाओढ आणि राजकीय हेवेदावे यातून उभय नेत्यांमधील दरी अधिक रुंदावल्याचे चित्र आहे.
“मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, बच्चू कडू म्हणजे सबसे बडा रुपय्या”, अशा शब्दात रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात जाऊन टीका केली. शिंदे गटात सामील होण्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोके मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यातच आता रवी राणा यांनी या पैशांवरून बच्चू कडूंवर शाब्दिक हल्ला चढवल्याने सत्तारूढ आघाडीतील या दोन आमदारांमधील वितुष्ट जगजाहीर झाले आहे.
हेही वाचा- तीन दिशांना तोंडे असल्याने महाविकास आघाडी निष्प्रभ
“आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?” असा सवाल त्यावर बच्चू कडूंनी विरोधकांना केला होता. विरोधकांच्या अशा आरोपांना काही अर्थ नसल्याचेही कडू म्हणाले होते. पण, आता सत्तारूढ आघाडीतील आमदारानेच जाहीरपणे गुवाहाटीचा उल्लेख करून बच्चू कडू यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने त्याची चर्चा रंगली आहे.
सत्तांतराच्या नाट्यात शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला तेव्हा, राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. त्यांच्यासह प्रहारचे दुसरे आमदार राजकुमार पटेल हेही शिंदे गटात सामील झाले. दुसरीकडे, युवा स्वाभिमान पक्षाच्या विस्ताराचे प्रयत्न करणारे आमदार रवी राणा हे बच्चू कडू यांचे स्पर्धक आहेत. खासदार नवनीत राणा यांनी मेळघाट आणि अचलपूर या दोन विधानसभा मतदार संघांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आदिवासी भागातून जनाधार वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतानाच अचलपूर परतवाड्यात अलीकडच्या काळात झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी राणा यांच्या समर्थकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळेच राणा यांनी सत्तारूढ आघाडीत एकत्र असूनही बच्चू कडू यांना लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. राणा दाम्पत्याने अचलपूर जिल्हा निर्मिती, शकुंतला रेल्वेचे पुनरूज्जीवन, रस्त्यांचे प्रश्न समोर आणून देखील कडू यांना डिवचले आहे.
हेही वाचा- मंत्रिमंडळाच्या पुढील विस्ताराची लोणीकरांना प्रतीक्षा
दोघा नेत्यांमध्ये यापूर्वीही खटके उडाले आहेत. तूर्तास बच्चू कडू यांनी राणा यांच्या टीकेला प्रत्यूत्तर न देता, योग्य वेळी बोलेन, असा सूचक इशारा दिला आहे. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे, तर बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे. दोन्ही नेत्यांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याचे दिसून आले, पण त्यांनी ‘थांबा आणि वाट पहा’चा मार्ग अवलंबला आहे. रवी राणा यांच्या समर्थकांनी तर विस्ताराच्या वेळी गुलालाच्या गोण्या तयार ठेवल्या होत्या, पण दोघांनाही मंत्रीपदाने हुलकावणी दिली. आता ही स्पर्धा नजीकच्या काळात तीव्र होणार आहे.