अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये चढाओढ

काँग्रेसच्‍या तुलनेत शिवसेना, राष्‍ट्रवादीची स्थिती कमकुवत असली, तरी अनेक जण उमेदवारीसाठी या पक्षाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांकडे डोळे लावून बसले आहेत.

Amravati congress loksatta
अमरावती जिल्‍ह्यात काँग्रेसच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये चढाओढ ( छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

अमरावती : महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्‍प्‍यात आली असताना जिल्‍ह्यातील विधानसभेच्‍या आठ जागांपैकी काँग्रेसच्‍या वाट्याला सर्वाधिक जागा येतील, हे स्‍पष्‍ट झाले आहे. जिल्‍ह्यात महाविकास आघाडीमध्‍ये काँग्रेसच मोठा भाऊ असेल, असे चित्र आहे. २०१९ च्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्‍ह्यात काँग्रेसने पाच जागांवर उमेदवार उभे केले होते, तर एक जागा राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या वाट्याला आली होती. काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने बडनेरातून अपक्ष रवी राणा यांना तर मोर्शीतून स्‍वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसला पाचपैकी तीन जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी मिळून पाच जागा जिंकता आल्‍या, तरी लवकरच फाटाफूट झाली. बडनेराचे आमदार रवी राणांनी भाजपला पाठिंबा दिला. तर मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांची स्‍वाभिमानी पक्षातून हकालपट्टी झाल्‍यानंतर अजित पवार यांचे समर्थक बनले. हे दोन्‍ही आमदार महायुतीत आहेत.

बदललेल्‍या परिस्थितीत काँग्रेसवर मोठा भाऊ म्‍हणून जबाबदारी आली आहे. महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली जात असताना राष्‍ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटातील इच्‍छुकांची संख्‍या वाढली आहे. पण, सर्वाधिक उमेदवार हे काँग्रेस पक्षाकडे आहेत. काँग्रेसच्‍या तुलनेत शिवसेना, राष्‍ट्रवादीची स्थिती कमकुवत असली, तरी अनेक जण उमेदवारीसाठी या पक्षाच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांकडे डोळे लावून बसले आहेत.

हेही वाचा : सिंदखेड राजात काका विरुद्ध पुतणी संघर्षाची चिन्हे! निवडणूक पूर्वीच लढत ठरली लक्षवेधी!!

काँग्रेसने तिवसा, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, धामणगाव रेल्‍वे, मेळघाट या सहा मतदारसंघांवर निवडणूक लढण्‍याची सज्‍जता केली असून मोर्शी आणि बडनेरा हे दोन मतदारसंघ घटक पक्षांसाठी सोडण्‍याची तयारी दर्शवल्‍याचे सूत्रांनी सांगितले. बडनेरामधून शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक जण इच्‍छूक आहेत. ही जागा शिवसेनेला तर मोर्शीची जागा राष्‍ट्रवादीला मिळण्‍याचे संकेत आहेत. उमेदवारी कुणाला मिळते, याकडे कार्यकर्त्‍यांचे लक्ष लागले आहे.

गेल्‍या निवडणुकीत आघाडी होऊनही काँग्रेस-राष्‍ट्रवादीचा जागा वाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. अमरावतीची जागा काँग्रेस पक्ष सोडण्‍यास तयार नव्‍हता, तर राष्‍ट्रवादीकडे मेळघाटची जागा काँग्रेसला देण्‍याचा पर्याय खुला होता, पण मतैक्‍य होऊ न शकल्‍याने मेळघाटमधून काँग्रेसच्‍या केवलराम काळेंना अनिच्‍छेने राष्‍ट्रवादीचा झेंडा हाती घ्‍यावा लागला, तर काँग्रेसतर्फे राष्‍ट्रवादीच्‍या सुलभा खोडके यांना उमेदवारी देण्‍यात आली. ही अदलाबदली चर्चेचा विषय बनली होती.

हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमदारकीचे वेध

यावेळी तिवसामधून आमदार यशोमती ठाकूर, अचलपूरमधून बबलू देशमुख, धामणगाव रेल्‍वेमधून वीरेंद्र जगताप, अमरावतीमधून डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार आहेत, त्‍यांच्‍या खेरीज इतरही इच्‍छूक उमेदवार आहेत. दर्यापूर आणि मेळघाटमध्‍ये काँग्रेस तिकिटोच्‍छुकांची सर्वाधिक गर्दी आहे. बडनेरातून शिवसेनेतर्फे माजी खासदार अनंत गुढे यांच्‍यासह प्रिती बंड, सुनील खराटे इच्‍छूक आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In amravati district congress will get more seats in mahavikas aghadi print politics news css

First published on: 20-10-2024 at 15:30 IST
Show comments