मोहन अटाळकर
अमरावती : स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी रस घेतला असून पडद्यामागून राजकारण सुरु झाले आहे. जिल्ह्यातील २५५ गावातील राजकीय वातावरण चांगले तापू लागले आहे. भावकी, नातेगोते यांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मात्र, सर्वपक्षीय राजकीय नेते सावध भूमिकेत आहेत.
अचलपूर विधानसभा मतदार संघात सत्ताधारी गटातील आमदार बच्चू कडू, भातकुली, बडनेरा मतदार संघात रवी राणा, मेळघाटमध्ये राजकुमार पटेल, तिवसा मध्ये कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, दर्यापुरात बळवंत वानखडे, मोर्शीत देवेंद्र भुयार, तर धामणगाव रेल्वे मतदार संघात भाजपचे प्रताप अडसड यांची परीक्षा आहे. याशिवाय भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचाही प्रचारात सहभाग लक्षवेधी ठरला आहे.
अचलपूर मतदार संघ हा बच्चू कडू यांचा बालेकिल्ला. मात्र, या ठिकाणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही मोर्चेबांधणी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून केली आहे. मोर्शी मतदार संघात राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले आमदार देवेंद्र भुयार यांच्यासमोर भाजपचे आव्हान असेल. भाजपचे नेते डॉ. अनिल बोंडे हे राज्यसभा सदस्य झाले असले, तरी त्यांचे या मतदार संघाकडे लक्ष आहे. शिंदे गटात प्रवेश करणारे राजेश वानखडे यांच्यासमोर तिवसा मतदार संघात यशोमती ठाकूर यांची तटबंदी भेदण्याचे आव्हान असेल. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे स्थानिक नेते ग्रामीण भागावर पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा… नाशिक: शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांचा रोख कुणावर ?
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी १ हजार ६ तर सदस्य पदासाठी ३ हजार ८६६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन ग्रामपंचायती आणि एकूण ४१३ सदस्य बिनविरोध निवडून आले असले तरी उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरु झाली आहे.
सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होत असल्याने या निवडणुका मोठ्या चुरशीच्या होणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पडद्यामागून रस घेतला आहे.
हेही वाचा… मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न, एमआयएमचा बुधवारी विधिमंडळावर मोर्चा
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनेल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.