अमरावती : लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात असताना सहा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची खरी कसोटी या निमित्ताने लागणार आहे. प्रबळ उमेदवारांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून किती मताधिक्य मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार नवनीत राणा यांच्या मताधिक्यावर नजर टाकली, तर अमरावती, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांना निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली होती. तर नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांच्या बडनेरा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातून अडसूळ यांना मताधिक्य मिळाले होते.
हेही वाचा : ‘या’ काँग्रेस नेत्याची पोस्टल बॅलेटद्वारे मतदनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली; काय आहेत कारणं?
अमरावतीतून राणा यांना सर्वाधिक २७ हजार ७६८ इतके मताधिक्य मिळाले होते, मेळघाटमधून १२ हजार १४६, दर्यापूरमधून ११ हजार १४६, तर तिवसामधून ४ हजार ५१५ इतके मताधिक्य मिळाले होते. अमरावतीचा कौल निर्णायक ठरला होता.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता, अचलपूरमधून बच्चू कडू हे स्वत: काठावर पास झाले होते. केवळ ८ हजार ३९६ मतांनी ते निवडून आले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे घटक असूनही बच्चू कडू यांनी त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दिनेश बुब यांना उमेदवारी देऊन भाजपच्या नवनीत राणा यांना पराभूत करणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. मेळघाटचे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना गेल्या निवडणुकीत तब्बल ४१ हजार ३६२ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यांनीही राणा यांच्या विरोधात प्रचार केला. या दोन नेत्यांच्या विरोधाचा कितपत फायदा दिनेश बुब यांना होतो, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे.
हेही वाचा : ओडिशातील आदिवासीबहुल भागात ‘द्रौपदी मुर्मू’ प्रचाराचा मुद्दा का झाल्या आहेत?
दर्यापूरचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत लढत दिली. गेल्या निवडणुकीत बळवंत वानखडे हे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात तब्बल ३० हजार मतांनी निवडून आले होते. दर्यापुरात त्यांची लोकप्रियता टिकून आहे की नाही, हे लवकरच कळणार आहे.
बडनेरा मतदार संघातून अपक्ष रवी राणा हे १५ हजार ५४१ मतांनी निवडून आले होते. पण, त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदार संघातून नवनीत राणा यांना मताधिक्य मिळवून देण्यात ते अपयशी ठरले होते. यावेळी राणा दाम्पत्याने हिंदुत्वाचा नारा दिला. नव्या भूमिकेत त्यांचा प्रभाव किती हे निवडणूक निकालातून स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : “गाय राष्ट्रीय प्राणी व्हावा म्हणून…”; पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्यांची विविध कारणे
अमरावतीतून गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी तत्कालीन भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना १८ हजार २६८ मतांनी पराभूत केले होते. डॉ. देशमुख हे काँग्रेसमध्ये परतले आहेत. अमरावतीचा कौल काँग्रेस किंवा भाजपच्या उमेदवारासाठी निर्णायक ठरणार का, हा प्रश्न चर्चेत आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणाऱ्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदार संघातील मतदानाकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील आमदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन देखील होणार आहे.