अमरावती : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर अपेक्षेनुसार रवी राणा आणि बच्चू कडू या आमदारद्वयांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. उभयतांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हे महायुतीचे घटक आहेत. पण, अमरावतीत लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार रिंगणात आणला, तेव्हाच नव्या संघर्षाची बीजे पेरली गेली होती. बच्चू कडू यांनी भाजपवर टीकेची एकही संधी सोडली नाही. नवनीत राणा यांना पराभूत करणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीरच केले होते.
हेही वाचा : पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यास केव्हापासून सुरुवात झाली? युतीच्या राजकारणाचा काय आहे इतिहास?
निवडणुकीच्या निकालानंतर दहा-बारा दिवसांनी आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडू यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. बच्चू कडू हे तोडपाणी करतात, नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरून रसद पुरविण्यात आली, असा आरोप रवी राणांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देत बच्चू कडूंनीही रवी राणांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. नवनीत राणा या भाजपमध्ये, रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षात. त्यामुळे लोकांत संभ्रम निर्माण होऊन फसगत झाली. रवी राणांना पराभव पचवता आलेला नाही. स्वत:मुळे पराभव झाला, हे राणांना समजून आले आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
बच्चू कडू आणि रवी राणा हे महायुतीत असले, तरी जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप होत आले आहेत. राज्यातील सत्तांतराच्या वेळी बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर दोघांमधील वाद शिगेला पोहचला होता.
हेही वाचा : “मतं दिली नाहीत म्हणून मुस्लिमांची कामं करणार नाही”; हे वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार कोण आहेत?
अचलपूरची जनता बच्चू कडू यांना धडा शिकवणार, असा दावा करताना रवी राणांनी त्यांचे लक्ष्य आता विधानसभा निवडणूक असल्याचे संकेत दिले आहेत. रवी राणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांच्यावरही टीका केली. मात्र, विरोधक असलेल्या आमदार यशोमती ठाकूर, नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे, बच्चू कडू यांचे अचलपुरातील प्रतिस्पर्धी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यावर टीका करण्याचे टाळले. उलट त्यांचे कौतुक केले. भूमिकेतील हा बदल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला.
हेही वाचा : उत्तर प्रदेशातल्या मतघसरणीची कारणं काय? भाजपा प्रत्यक्ष मैदानात उतरून घेणार आढावा
२०१९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांना ५ लाख १० हजार ९४७ मते मिळाली होती. यावेळी भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढताना त्यांना दलित, मुस्लिमांचा जनाधार गमवावा लागला, तरीही त्यांना ५ लाख ६ हजार ५४० मते मिळाली. भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी राणा दाम्पत्याने केलेली धडपड व्यर्थ गेली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी ८५ हजार ३०० मते घेऊन काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या विजयात हातभार लावला. त्यामुळे राणा अस्वस्थ आहेत. अचलपूर विधानसभा मतदार संघात बच्चू कडू यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न राणा करतील, त्याला बच्चू कडू कसे उत्तर देतात, हे आगामी काळात पहावे लागणार आहे.