अमरावती : जिल्‍ह्यात शह-काटशहाच्‍या राजकारणाला वेग आला असून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्‍पर्धी असलेले प्रहार जनशक्‍ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्‍चू कडू यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाचे संस्‍थापक आमदार रवी राणा यांना मोठा धक्‍का दिला आहे. गेल्‍या काही वर्षांपासून या दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये संघर्ष पेटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्‍ही नेते एकमेकांवर टीका करण्‍याची एकही संधी सोडत नाहीत. बच्‍चू कडू हे महायुतीत होते, ते गुवाहाटीला गेले, त्‍यावेळी खोक्‍यांचे डील झाले, तेव्‍हा अचलपूरच्‍या जनतेला विचारले नाही. आज त्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. महायुतीत राहून मंत्रिपद घेण्‍यासह खोक्‍याचे राजकारण करणे बच्‍चू कडूंना चालते. पण जेव्‍हा नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीसाठी उभ्‍या होत्‍या, तेव्‍हा बच्‍चू कडू यांनी उमेदवार दिला आणि मतांचे विभाजन करून भाजपच्‍या उमेदवाराला पराभूत करण्‍याची सुपारी घेतली, अशी टीका रवी राणांनी केली.

हेही वाचा : मनोमिलनानंतर इचलकरंजीतील भाजपातील नाराजीनाट्य रंगतदार वळणावर

दरम्‍यान, गुरूवारी युवा स्‍वाभिमान पक्षाचे मुख्‍य प्रवक्‍ते जितू दुधाने यांनी पक्षाला रामराम ठोकला. युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या स्‍थापनेच्‍या पुर्वीपासून मी गेली १७ वर्षे सातत्‍याने आणि अत्‍यंत समर्पित भावनेने आपल्‍यासोबत अहोरात्र कार्य करीत आलो आहे. आजपर्यंत अनेक गुन्‍हे माझ्यावर दाखल झाले, परंतु कधी मागे हटलो नाही. आजवर शक्‍य तितके मी सर्व काही केले, पण आता पक्षात माझी घुसमट होत आहे. त्‍यामुळे आपण माझा राजीनामा स्‍वीकारून मला सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्‍त करावे, असे जितू दुधाने यांनी आपल्‍या राजीनामा पत्रात म्‍हटले आहे. जितू दुधाने हे रवी राणा यांचे विश्‍वासू सहकारी मानले जात होते. रवी राणांसाठी हा मोठा धक्‍का होता.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांना शेकापची साथ नकोशी ?

रवी राणांनी जितू दुधाने यांची समजूत काढण्‍यासाठी प्रयत्‍न केले, पण ते संपर्कक्षेत्राच्‍या बाहेर गेले. शुक्रवारी रात्री त्‍यांनी अचलपूर येथे बच्‍चू कडू यांच्‍या उपस्थितीत प्रहार जनशक्‍ती पक्षात प्रवेश केला. हा रवी राणांसाठी दुसरा धक्‍का ठरला. लोकसभा निवडणुकीत युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांनी दुय्यम दर्जाची वागणूक सहन केली. पक्षात कार्यकर्त्‍यांची घुसमट होत आहे. अजून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते पक्ष सोडण्‍याच्‍या तयारीत आहेत, असा दावा जितू दुधाने यांनी केला. “रवी राणांना पक्ष सांभाळता आला नाही. आम्‍ही जितू दुधाने यांना फोडलेले नाही. ते स्‍वत:हून आमच्‍याकडे आले. त्‍यांचे पक्षात स्‍वागत आहे”, अशी प्रतिक्रिया बच्‍चू कडू यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati ravi rana s party leader jitu dudhane joined bachchu kadu prahar janshakti party print politics news css