आंध्र प्रदेशमध्ये नुकताच १०वीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल केवळ ६२.२६% लागला असून ही गेल्या २० वर्षातली सर्वात कमी टक्केवारी आहे. या निकालावरून आंध्र प्रदेशमध्ये राजकीय गोंधळ उडाला आहे. १० वी च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे दोन लाख मुले अनुत्तीर्ण झाली आहेत. कोविडच्या साथीनंतर झालेली ही पहिलीच ऑफलाईन परीक्षा होती. ६ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. नुकतीच टीडीपीने याविषयावर व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती. पक्षाचे सरचिटणीस नारा लोकेश नायडू १० वी च्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधणार होते. विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यासाठी लिंक देण्यात आली होती.

व्हिडिओ कॉन्फरन्सवरच नेत्यांचा वाद

सकाळी ११ वाजता ही कॉन्फरन्स सुरू झाली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वर्गात लक्ष केंद्रित होत नसल्याचे सांगितले तर काहींनी अभ्यासक्रमाचा बराचसा भाग त्यांना समजलाच नसल्याचे सांगितले. कॉन्फरन्स सुरू झाल्याच्या काही मिनिटांतच वायएसआरसीपीचे नेते आणि माजी मंत्री कोलाडी व्यंकटेश राव, आमदार वल्लभनेनी वामसी मोहन, वायएसआरसीपी सोशल मीडिया समन्वयक देवेंद्र रेड्डी आणि नगरसेविका कोथापल्ली रजनी अचानक स्क्रीनवर दिसू लागले. रेड्डी यांनी टीडीपीवर १० वी च्या निकालाचे राजकारण होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “तुम्ही विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टींमध्ये गुंतवून त्यांच्यासोबत राजकारण का करत आहात?”

ऑनलाईन वादाचे राजकीय पडसाद

नायडू यांनी मात्र या वादात पडण्यास नकार दिला. वायएसआरसीपीच्या नेत्यांना काय हवे आहे याची चर्चा करण्याची ही जागा नाही. अचानक  गोंधळ सुरू झाल्यामुळे टीडीपीच्या सोशल मीडिया टीमने वायएसआरसीपीच्या नेत्यांचे कॉल बंद केले. नायडू यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लॉगइन तपशिलाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. नायडू म्हणाले की, “सुरुवातीला एका विद्यार्थ्याने लॉगइन केले. नंतर काही वेळाने राव हे त्या विद्यार्थ्याच्या बाजूला येऊन बसले आणि आरोप करायला सुरवात केले. यावरून स्पष्ट होते की त्यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लॉगइन आयडीचा गैरवापर केला आहे”.

या वादावर वायएसआरसीपीचे आमदार वामसी म्हणाले की, “निकाल इतका कमी का लागला याचा सरकार अभ्यास करत आहे.” या परीक्षेत ३२.७४ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की परीक्षेला बसलेल्या एकूण मुलींपैकी एकूण ७०.७० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. एकूण ६०% मुलांनी परीक्षा दिली होती. गणित आणि विज्ञान या विषयांत सर्वाधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. हे विषय ऑनलाईन शिकवण्यात अडचणी येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

खरे तर विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणात नापास का झाले? याचे कारण शोधणे गरजेचे असताना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही विद्यार्थ्यांच्या या कठीण काळात राजकीय संधी शोधताना दिसत आहेत.

Story img Loader