लोकसभा निवडणुकीच्या निकालावर हुरळून न जाता शरद पवार यांनी गेली साडे तीन महिने विधानसभेसाठी सारी जुळवाजुळव सुरू केली आहे. कोल्हापूरमध्ये मंगळवारी झालेल्या सभेत भाजपमधून आलेल्या समरजित घाटगे यांना पक्षात प्र‌वेश देण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातील अन्य काही नेतेही शरद पवारांना साथ देण्याच्या तयारीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदापूरमध्ये भाजपची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गेल्याच आठवड्यात शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील हे सुद्धा पवारांच्या पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. अन्य काही जिल्ह्यांमधील भाजप, अजित पवार गटातील नेते शरद पवारांच्या पक्षात प्र‌वेश करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ होता. यंदा भाजपमध्ये अजून तरी तेवढा ओघ दिसत नाही. याउलट शरद पवारांच्या प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

हे ही वाचा… निवडणुकीसाठी राज्यात संघ ‘दक्ष’; मुख्यमंत्रीपद भाजपला मिळविण्याचा निर्धार; प्रत्येक मतदारसंघात भाजप-संघ समन्वयक

विधानसभेची निवडणूक शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. राज्यात सत्ताबदल करण्याबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी करण्याची पवारांची योजना आहे. शरद पवार यांनी स्वत:च्या ताकदीवर ६० पेक्षा अधिक आमदार निवडून आणले आहेत. १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसच्या वतीने लढताना पवारांचे ५४ आमदार निवडून आले होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर ५८ आमदार निवडून आले होते. २०१४ मध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढला होता. तेव्हा पक्षाचे ४१ आमदार निवडून आले होते. २००४ मध्ये काँग्रेसबरोबर आघाडीत राष्ट्रवादीचे ७१ आमदार निवडून आले होते. २००९ मध्ये ६३ तर २०१९ मध्ये ५४ आमदार निवडून आले आहेत. या साऱ्या आकडेवारीवरून शरद पवार यांच्या पक्षाचे स्वबळावर लढताना किंवा आघाडीत ६०च्या आसपास आमदार निवडून आले आहेत.

हे ही वाचा… कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान

शरद पवारांची ६०च्या आसपास आमदार निवडून आणण्याची ताकद आहे. यंदाही ही ताकद दाखवून देण्यासाठी पवार तयारीनिशी रिंगणात उतरले आहेत. मुंबई व विदर्भ हे पवारांचे नेहमीच कच्चे दुवे राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात ताकद दाखवून देण्याची त्यांची योजना आहे. या दृष्टीने जागावाटपात कोणत्या जागा पदरात पाडून घ्यायच्या व जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील याचे नियोजन पवारांकडून करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In assembly elections 2024 sharad pawar will have miracle of electing more than 50 mlas again print politics news asj