सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भाषणापूर्वीच सोमवारी सायंकाळच्या वेळी अनेक महिलांनी सभास्थळ सोडल्यामुळे रिकाम्या खूर्च्या दिसू लागल्या. परिणामी भाजपच्या लोकसभा तयारीच्या पहिल्या सभेच्या प्रभावावर आता प्रश्नचिन्ह उभे ठाकले. मात्र, या सभेनंतर झालेल्या गाभा ( कोअर) समितीच्या बैठकीत भाजपचे हिंदुत्त्व हेच योग्य असल्याचा संदेश आवर्जून दिला जावा, असे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात हिंदुत्व हेच निवडणुका जिंकण्याचे इंजिन असल्याची चर्चा १०० हून अधिक प्रतिनिधी असणाऱ्या गाभा समितीमध्ये करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा… शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे भाजप अस्वस्थ
हेही वाचा… निरुत्साही गर्दीसमोर नड्डांकडून योजनांची उजळणी; राजकीय लाभ किती ?
१९७१ पासून शिवसेना आणि भाजप युतीने सातवेळा औरंगाबाद लाेकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. तत्पूर्वी काँग्रेस, जनता पक्ष आणि समाजवादी काँग्रेसने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ प्रत्येकी एकदा राखला होता. एकूण मतदारयादीमध्ये चार लाख १५ हजारांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी २१.८ टक्के मतदार मुस्लिम असल्याने सभेत एजाज देशमुख यांचे भाषण भाजप नेत्यांनी सर्वात पहिल्यांदा ठेवले होते. पण ‘बातों मे असर दे दो’ अशी विनंती करण्यापलिकडे त्यांच्या भाषणाला भाजप कार्यकर्त्यांवर काहीएक परिणाम झाला नाही. जातनिहाय मतदारांची मानसिकता, नेत्यांचे वागणे- बोलणे यावरही बारकाईने चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. १८ लाख ८६ हजार मतदारांचे जात व धर्मनिहाय विश्लेषण केल्यानंतर लोकसभा लढवायची तर कोणती रणनीती असावी, यावर सोमवारी रात्री चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणूक तयारीचे प्रभारी आमदार प्रशांत बंब यांनी सादरीकरण . मतदारांच्या मानसिकता आणि केलेली कामे या आधारे मतदारांपर्यंत कसे पोहचायचे यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. कोणत्या पक्षावर टीका करायची, कोणाला मित्र मानायचे, कोणत्या घटनांचे परिणाम मतदारांवर होत आहेत, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. येत्या काळात भाजपच्यावतीने घ्यावयाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करताना नेत्यांनी कसे वागावे, कोणता संदेश दिला जावा, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.