सुहास सरदेशमुख

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे बाजारमूल्य १० कोटी ६४ लाख ३५ हजार ४७७ रुपये एवढे असून, त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे किरण पाटील यांची संपत्ती सहा कोटी ९८ लाख ४२ हजार ४३२ रुपये एवढी असल्याचे त्यांनी दिलेल्या शपथपत्रावरून स्पष्ट झालेले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांनी प्रचारासाठी केलेल्या दैनंदिन खर्चाचा अहवाल सादर करण्याची पद्धत निवडणुकीत प्रक्रियेत समाविष्ट केलेली नाही. मात्र, संपत्तीविषयक शपथपत्र देणे अनिवार्य आहे. त्यानुसार दाखल केलेल्या शपथपत्रांच्या आधारे जमीनजुमला, दागिने, बंधपत्रे, विम्याच्या रकमा तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती देणे अपेक्षित असते.

हेही वाचा… पंतप्रधान मोदींच्या शासकीय समारंभांचा राजकीय वापर? विरोधकांचा आक्षेप

विक्रम काळे यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे चार लाख ७१ हजार रुपयांची रोख रक्कम असून, विविध बँकांतील पाच खात्यांमध्ये मुदतठेवी व बचत खात्यात तसेच सहकारी संस्थांमध्ये त्यांनी केलेला गुंतवणुकीचा तपशील देण्यात आला आहे. बंधपत्रे, शेअर्स तसेच विम्याच्या रकमेबाबात दिलेल्या तपशिलानुसार त्यांच्याकडे दोन कोटी ४१ लाख ६८ हजार ९७७ एवढी वैयक्तिक मालमत्ता आहे. याशिवाय स्थावर मालमत्तांच्या तपशिलामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसत येथे शेतजमीन असून लातूर येथे घर, भूखंड आणि औद्योगिक वसाहतीमध्ये एक शेडही असल्याची नोंदही देण्यात आली आहे. शेतजमिनीसह त्याचे केलेले अंदाजित बाजारमूल्य गृहीत धरता आठ कोटी २२ लाख ६७ हजार ५०० रुपयांची संपत्ती त्यांच्या नावावर आहे. जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ते मुख्याध्यापक म्हणून नोकरी करतात. याशिवाय शेती, भाडे आणि वेतन आदीं स्रोतातून ही संपत्ती त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा… बीड जिल्ह्यातील देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापासून मुंडे भगिनी पुन्हा दूर

भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्याकडे रोख रक्कम, दागिने, वाहनमूल्य तसेच विमापत्रे व कंपनीत केलेली गुंतवणूकीचा यात समावेश आहे. याशिवाय अंबाजोगाई तालुक्यातील सेलू येथे जमीन, औरंगाबाद जिल्ह्यातील बाळापूर, गांधेली, तीसगाव, देवळाई येथे भूखंड व भागीदारीतील भूखंड असल्याचे तपशील त्यांनी शपथपत्रात नोंदविलेले असून या मालमत्तेची एकूण किंमत सहा कोटी ६५ लाख ४१ हजार ८७७ रुपये एवढी आहे. किरण पाटील यांच्याकडे रॉयल इनफिल्ड या कंपनीची दुचाकी वाहन आहे. दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या गुंतवणुकीचे आणि कर्जाबाबतचे तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुूपूर्द केले आहे. किरण पाटील हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून त्यांनी बी.एससी. बी.पी.एड. असे शिक्षण घेतलेले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In aurangabad teachers constituency election both candidates are rich print politics news asj