आमच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे, असे बारामतीचे रहिवासी सध्या खासगीत बोलत आहेत. कारण बारामतीचा लोकसभा मतदारसंघ दोन्ही पवारांच्या लढतीमुळे हायप्रोफाइल झाला आहे. खरं तर बारामतीत कधी नव्हे ते पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतो आहे. शरद पवार यांची मुलगी आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे असून, त्यांच्या काकांचे बोट धरूनच ते राजकारणात आले आहेत. ते सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. शनिवारी सुनेत्रा पवार यांची अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)कडून बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. परंतु बारामतीतील बहुतेक जनतेला एका पवार विरुद्ध दुसरा पवार निवडायला आवडणार नसल्याचंही समजतंय. “सुप्रियाताई हरल्या तर आम्हाला बरे वाटणार नाही,” असेही मालेगावमध्ये चहाचे छोटेसे दुकान चालवणारी तरुणी म्हणाली आहे. लेखिका नीरजा चौधरी यांनी इंडियन एक्सप्रेसमधील त्यांच्या सदरात ही माहिती दिली आहे.

परंतु संघर्ष ताई आणि वहिनी यांच्यात नव्हे, तर सर्वत्र ओळखले जाणारे साहेब म्हणजेच शरद पवार आणि दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्यात आहे. १९९८ मध्ये सोनिया गांधींच्या उदयानंतर पवारांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसनं कायमच बारामतीची जागा राखली आहे. गेल्या वर्षी अजित पवार यांनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी ५३ पैकी ४१ आमदारांना आपल्याबरोबर घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह घड्याळ आता अजित पवारांना मिळाले आहे. खरं तर राष्ट्रवादीचं हे प्रकरण न्यायालयात असले तरी निवडणूक आयोगाच्या निकालामुळे अजित पवारांना चिन्ह वापरण्याची परवानगी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार हे नाव देण्यात आले असून, तुतारी हे चिन्ह मिळाले आहे.

हेही वाचाः अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

अजित पवार यांच्याकडे संघटनेचा ताबा असला तरी जनतेची सहानुभूती ही मोठ्या साहेबांकडे म्हणजेच शरद पवारांकडेच आहे. पवार साहेबांना मोठी सहानुभूती आहे, असेही बारामतीतील एका गृहिणीने सांगितले. साहेबांनी आमच्यासाठी बरंच काही केले आहे. असे असताना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आम्ही त्यांना दुःख कसं देऊ शकतो?, असंही मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याने सांगितले. अजित पवार यांनीसुद्धा साहेबांची साथ कधीच सोडली नसती, परंतु आम्हाला माहीत आहे की ते ईडीच्या भीतीमुळे सोडून गेले. पवारांना मुलगा नाही, फक्त मुलगी आहे. शेवटी साहेबांनीच अजितदादांना जे काही करता आले ते करण्याची संधी दिली, असंही एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने सांगितले.

हेही वाचाः ‘सूर्यवंशम’ अभिनेत्री रचना बॅनर्जींनी लोकसभा जिंकण्यासाठी कसली कंबर; उमेदवारी देण्यामागे ममतादीदींचे गणित काय?

अजित पवारांनी बारामती मतदारसंघासाठी भरपूर काम केले आहे, असंही तिथल्या रहिवाशांनी कबूल केले आहे. त्यांनी बारामतीत जमलेल्या हजाराहून अधिक मुस्लिमांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली. अजित पवारांनी बारामतीत घेतलेल्या आठ रॅलींपैकी पहिल्या रॅलीत ते मुस्लिम समाजातील महिलांविषयी बोलताना दिसले. त्यातील महिलाही अजित पवारांनी केलेल्या मुस्लिम महिलांसाठीच्या प्रयत्नांबद्दल बोलत होत्या. कोविडच्या काळात मी माझा नवरा गमावला. मला तीन मुले आहेत. मला कोणी भेटायला आले नाही. फक्त अजितदादा आले होते, मला कोणती मदत हवी आहे ते पाहण्यासाठी ते आले होते, असंही एका मुस्लिम महिलेनं सांगितलं. पवार काका आणि पुतण्या जोडीमुळेच बारामतीचा विकास झाल्याचे तिथले रहिवासी सांगतात. बारामतीमध्ये मिळालेल्या शिक्षणामुळे माझी तीन मुले आज USA मध्ये Apple, Facebook आणि IBM मध्ये नोकरी करतात,” असे एका गृहिणीने सांगितले.

पवार विरुद्ध पवार हा लढा अनेकांना धर्मसंकट वाटतो आहे, कारण आम्ही कोणालाही मतदान केले तरी दोन्ही बाजूंना ते समजणार असल्याची भीती मतदारांना वाटते. विशेष म्हणजे पक्षाच्या व्यतिरिक्त पवार कुटुंब दरवर्षी एकत्र येत असतात. यात अजित पवारांचा मोठा भाऊ श्रीनिवाससुद्धा उपस्थित असतात. आम्ही साहेबांचे खूप ऋणी आहोत, असेही गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीनिवास म्हणाले होते. तसेच श्रीनिवास यांचा मुलगा युगेंद्रनेही सुप्रिया सुळेंना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं होतं. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या राजकीय घराण्यासाठी महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामतीकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष आहे. राज्याच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मोठ्या लढाईचे बारामतीदेखील प्रतीक आहे. लोकसभेच्या ४८ जागांमुळे महाराष्ट्र हे भाजपाच्या रडारवर सर्वात वरचे राज्य आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडूनही आपला विजय सोपा असेल, असे भाजपाला वाटत नाही. भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुतीने राज्यात ताकद वाढवण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांचे प्रतिस्पर्धी असले तरी त्यांनी सुप्रिया यांना पाडण्यासाठी ताकद लावली आहे. दुसरीकडे सुप्रिया यांच्या विजयासाठी पवारांनी केलेल्या हालचाली सगळ्यांनीच पाहिल्या आहेत. पवार यांनी २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपाकडून उभे राहिलेल्या धनगर समाजातील महत्त्वाचे नेते महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला आहे. धनगरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पवारांनी शेजारच्या मतदारसंघात जानकरांना पाठिंबा देऊ केला आहे. फडणवीस यांनी मात्र लोकसभा मतदारसंघाचे आश्वासन देऊन जानकर यांना एनडीएत आणले आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे फोटो व्हायरल झाले. फडणवीसांनी अजित पवारांच्या विजय शिवतारे यांच्यासारख्या कडव्या विरोधकांनाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आणले होते, तसेच शिंदेंच्या सेनेने बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे जिंकल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह म्हणून शरद पवारांची प्रतिमा उंचावेल. तसेच भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी व्यक्तींपैकी एक म्हणून पवारांचे स्थान अधिक बळकट होणार आहे. जर अजित पवारांनी आपल्या काकांना अयशस्वी केले, तर ते महाराष्ट्रातील हिमंता बिस्वा सरमा बनण्याची शक्यता आहे. सुप्रिया हरली तर अजितदादाच ‘साहेब’ होणार असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. दुसरीकडे अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाल्यास त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. तसेच मराठा समाजातील अभिमानी घराण्याला आपले मैदानही राखता आले नसल्याचं सांगून त्यांची हेटाळली केली जाईल. बारामतीच्या लढाईने पवार कुटुंब आणि अर्धशतकापासून पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ विभागला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता फूट पडली असून, बारामती हेही कसोटीचे मैदान झाले आहे. शरद पवारांचे पाच दशकांहून अधिक काळातील राजकारणातून बारामती मतदारसंघ पुन्हा सुप्रिया सुळेंना मिळवून देतात का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

(लेखिका नीरजा चौधरी या इंडियन एक्सप्रेसमध्ये Contributing Editor असून, गेल्या १० लोकसभा निवडणुका त्यांनी कव्हर केल्यात. त्या How Prime Ministers Decide पुस्तकाच्या लेखिका आहेत.)

Story img Loader