छत्रपती संभाजीनगर: प्रमुख राजकीय विरोधक असलेल्या पंकजा मुंडे यांच्याशी पक्षीय आणि कौटुंबीक पातळीवरही ‘युती’ असल्यामुळे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान देणाऱ्या नेत्याची परळी विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे. त्या मोहिमेअंतर्गतच स्थानिक राजकीय विरोधकांनी धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडून एकीकरणाचा एक प्रयोग शेतकरी मोर्चाच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न केला आहे. या मोर्चापासून काही नेते अंतर राखून असले तरी स्थानिक व राज्यस्तरावरील भाजपचे पदाधिकारीही थेट सहभागी झाले होते, हे विशेष. भाजपमधील स्थानिक एक गटही धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांच्या कारभारावर नाराज असून आगामी निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून प्रत्यक्ष काम करायचे की नाही, यावर त्यांच्यामध्ये सध्या खल सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर परळीत नुकतीच काही भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांची एक फळी धनंजय मुंडे यांच्याविरोधात एकवटली आहे. शेतकऱ्यांचा रखडलेला पीकविमा, सोयाबीन, कापसाला अधिकचा भाव मिळावा, आदी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर, बैलगाडी मोर्चाच्या आडून धनंजय मुंडे यांच्याविरोधात आघाडी उभी करून आव्हान उभे करण्याची धडपड सुरू आहे. धनंजय मुंडेंविरोधात उभे राहण्यासाठी विरोधी गटाकडून दरराेज एक नाव समोर येत असून, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम उमेदवाराची चाचपणी करत आहे. बीड जिल्ह्यातील काही नेत्यांनी शरद पवार यांची अलिकडेच भेट घेऊन परळीतून उमेदवारी मिळवण्यासाठी साखर पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्य पातळीवरील सत्तासमीकरणे बदलण्याचा राजकारणाचा नवा प्रयोग पुढे आला. भाजपचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट घेऊन थेट सत्तेत सहभागी झाले. तत्पूर्वीपर्यंत परळीच्या स्थानिक राजकारणात नात्याने चुलत भाऊ-बहीण असलेले धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू असायचा. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याने त्यांच्या विजयासाठी धनंजय मुंडे यांनीही अटोकाट प्रयत्न केले. परळीतून पंकजा मुंडे यांना जवळपास ७४ हजारांचे मताधिक्यही मिळवून देत भाऊ या नात्याने प्रचाराचे पालकतत्त्वही स्वीकारले होते. मात्र, पंकजा यांचा साडे सहा हजार मताने पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत परळीची जागा अजित पवार गटाला सुटून धनंजय मुंडे हे मैदानात असतील तेव्हा भाजपचा येथून उमेदवार नसेल. चाळीस वर्षांमध्ये प्रथमच परळीत कमळ चिन्हाचा उमेदवार नसेल. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने आणि राज्यातही महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजप सत्तेत असल्याने धनंजय मुंडेंसमोर सक्षम उमेदवार कोण, हे नाव समोर येत नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील नाराजी, एकगठ्ठा मतदान होणारे भाग, शरद पवार यांची भूमिका, या पातळीवरील विचारांती परळीत काही नेत्यांनी राजकीय विरोधकांच्या एकीकरणाची आघाडी उघडण्याचा प्रयोग मोर्चाच्या माध्यमातून करून पाहिला आहे.