परळी विधानसभा मतदारसंघात गोपीनाथ मुंडे आणि कमळ निवडणूक चिन्हे हे समीकरण तयार झाले होते. मुंडे यांच्या पश्चात त्यांची कन्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवित होती. पण यंदा मुंडे मैदानात असतील पण कमळ हे चिन्ह नसेल. कारण महायुतीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील व भाजपचा त्यांना पाठिंबा असेल. यामुळेच परळीत मुंडे असतील पण कमळ चिन्ह नसेल असे राजकीय चित्र दिसू लागले आहे.
राज्याच्या राजकारणात परळी विधानसभा मतदारसंघ तसा नेहमीच लक्षवेधक. १९७८ मध्ये भाजपची स्थापना झाली तेव्हापासून म्हणजे १९८० पासून परळीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या रुपाने कमळ चिन्ह रुजले. तत्पूर्वी हा मतदारसंघ रेणापूर विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात. लातूर ग्रामीणचा काही भाग त्याला जोडलेला होता. या मतदारसंघातील रचनेमुळे गाेपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यातील मैत्र जुळलेले होते. १९६७ च्या निवडणुकीमध्ये जेव्हा ५२.५४ टक्के मतदान झाले होते तेव्हा कॉग्रेसचे ए. जी गित्ते निवडून आले होते. पुढे १९७२ च्या निवडणुकीमध्ये शेकाप आणि कॉग्रेस अशी या मतदारसंघात लढत होत. १९७८ च्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक लढवली पण जनता पक्षाचे चिन्ह नांगरधारी शेतकरी हे होते. पुढे १९८० मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवली. ते एकदाच पराभूत झाले. १९८५ मध्ये पंडित अण्णा दौंड या कॉग्रेसच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीनंतर १९९०, १९९५ , १९९९, २००४ पर्यत गोपीनाथ मुंडे यांनी कमळ रुजवले. २००९ च्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडे विरोधात गेले. पुढे २०१४ मध्ये पंकजा मुंडे मंत्री झाल्या. जलसंधारण मंत्री, महिला बालकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र, भाजप अंतर्गत कुरघोडीमध्ये पंकजा मुंडे यांना भाजपातील नेते जाणीवपूर्वक दूर लोटत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. पंकजा मुंडे- देवेंद्र फडणवीस यांच्यामधील संघर्षातून अनेक कुरघोड्या पुढे आल्या. याच काळात धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या गटात चांगली बांधणी करुन घेतली होती. परळीतून ‘ कमळ’ शक्ती क्षीण होत होती. स्थानिक स्वराज्य संस्थामधून कमळ जवळपास गायब झाले होते. अशा काळात पुन्हा राजकीय पट बदलला. लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या. मात्र त्यांना परळी मतदारसंघातून त्यांना ७४ हजार ८३४ मताधिक्य होते. महायुतीमुळे कमळ शक्ती कमी करणाऱ्या धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीमध्ये कमळाचा प्रचार करावा लागला.. १९८५ पासून मुंडे यांच्या घरातील कोणी तरी संविधानिक पदावर होतेच. विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वी दोन महिने त्याला अपवाद होते. आता परळी मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार नाही. धनंजय मुंडे आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर ते निवडणूक लढवतील असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे परळीतून कमळाविना मुंडे असे चित्र दिसू शकेल.
हेही वाचा : नांदेडमध्ये नेत्यांचे वारसदार रिंगणात
परळी विधानसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसचे राजेभाऊ देशमुख तयारी करत आहेत. महाविकास आघाडीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे इच्छूक उमेदवार निवडणुकीसह एरवी होणाऱ्या गुन्हेगारीला मुद्दा बनवून निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी करत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुदामती गुट्टे यांचेही नाव चर्चेत आणले जात आहे. निवडणुकीचा निकालापेक्षाही गोपीनाथ मुंडेंच्या परळीत विधानसभा निवडणुकीत कमळ मात्र दिसणार नाही, अशी चर्चा रंगली आहे.