छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यात महायुतीतीलच नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालादिवशीपासून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या विजयी मिरवणुकीपासूनच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आमदार धस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. आता आमदार धस यांच्या मतदारसंघातच मैत्रीपूर्ण लढत दिलेले महायुतीतीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सुरेश धस यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.

आजबे यांनी गुरुवारी बीडमध्ये पत्रकार बैठक घेऊन आमदार सुरेश धस यांच्यावर भूमाफियासह गंभीर आरोप केले. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आमदार धस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश असून, त्यांनी अनेक देवस्थानांच्या जमिनी लाटल्या आहेत. त्यांचे इतरांवर आरोप करणे म्हणजे दिव्याखाली अंधारासारखे आहे, अशी टीका आजबे यांनी केली. मतदारसंघातील विकास कामे अडवून ठेवून कोट्यवधींची बंधारे आमदार धस सुरू करू देत नसून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. श्रीराम, विठोबा, खंडोबा, पिंपळेश्वर महादेव आदी देवस्थानमध्येही आमदार धस यांनी हस्तक्षेप करणे सुरू केले असून, शेवगावच्या भांगे ऑर्गनिक कंपनीसोबतच्या करारानंतर त्या कुटुंबीयांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तसेच एका ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीचीही जमीन हडप करून स्वत:च्या नातेवाईकाच्या नावावर केल्याचा गंभीर आरोपही माजी आमदार आजबे यांनी केला.

आमदार धस हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी स्पर्धा करण्याच्या तयारीला लागले आहेत. देशमुख कुटुंबीयांबाबतची आमदार धसांची आस्था नाटकी आहे. आपण राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार असताना विधानसबा निवडणुकीत आमदार धस यांना वाल्मीक कराडने आर्थिक मदतही केली असून, पक्षाशी संबंधित वाल्मीक कराड यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार धस यांना आर्थिकसह इतर प्रकारे मदतही केली आहे. या दोघांच्या मोबाईल फोनचा तपशील तपासावा, अशी मागणी करून आजबे यांनी आष्टीतही अनेक खून प्रकरणे घडल्याकडे लक्ष वेधले. आमदार धस यांना त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते वाचवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. यासंदर्भात आपण अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असून, आमदार धस यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे बोलू, असे आश्वास्त केल्याचे आजबे म्हणाले.

मागील अडीच महिन्यांपासून आमदार धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करून राज्यभर राळ उठवून दिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे-आमदार धस यांच्या भेटीचे वृत्त बाहेर आले. त्यानंतर आमदार धस यांनी परळीत जाऊन महादेव मुंडे हत्या प्रकरणाला हवा देण्यास सुरुवात केली. आमदार धसांचा वारू पुढे सरकत असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी अचानकपणे समोर आले. त्यांनी थेट आमदार धस यांनाच लक्ष्य केले. बीडमधील महायुतीतच सुरू झालेले हल्ले-प्रतिहल्ले आणखी कुठपर्यंत जातात, हे पाहणे आैत्युक्याचे ठरणार आहे.

Story img Loader