नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या बंडखोरीमुळे भाजपचे वरिष्ठ नेते कमालीचे सावध झाले असून नाईक यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांना गळाला लावण्यासाठी पक्षाची वरिष्ठ पातळीवरील यंत्रणा कामाला लागल्याचे सांगितले जाते. काँग्रेसचे नवी मुंबईतील जिल्हाध्यक्ष अनिल कौशीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजू शिंदे यांना पक्षात घेताना भाजपच्या ठाणे, डोंबिवलीतील नेत्यांना सक्रिय केले गेल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ही मोहीम फत्ते करत असताना बेलापूरच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनाही दूर ठेवले गेल्याचे वृत्त आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक कुटुंबियांच्या ताकदीची भाजप नेत्यांना पुर्णपणे जाणीव आहे. संदीप नाईक यांनी बेलापूरमधून बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश करताच भाजपच्या या भागातील २५ पेक्षा अधिक नगरसेवकांनीही त्यांच्यासोबत तुतारी हाती घेतली. २०१४ नंतर नवी मुंबईतील काही उपनगरांमध्ये भाजपचा प्रभाव वाढला आहे. वाशी सेक्टर १७ सारख्या गुजराती बहुल भागात भाजपला मोठे मताधिक्य मिळते असा अनुभव आहे. या भागातील संपत शेवाळे, विजय वाळुंज यासारखे माजी नगरसेवक देखील संदीप नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात गेले. बेलापूर मतदारसंघात आगरी समाजाची एक मोठा मतगठ्ठा आहे. नेरुळ भागातील क्रिकेट मैदानाच्या जागेचे आरक्षण बदलण्यावरुन झालेल्या वादाचा मोठा परिणाम या समाजातील एका मोठया घटकावर होऊ शकतो. त्यामुळे भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना ही निवडणूक आव्हानात्मक मानली जात आहे. हे लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बेलापूरमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून या भागातील महाविकास आघाडीतील नाराजांना थेट गळाला लावण्याची रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : उरण विधानसभेची तिरंगी लढत निश्चित, भाजपा, शिवसेना, शेकाप यांच्यात चुरस
रविंद्र चव्हाणांना सक्रिय होण्याच्या सूचना ?
ऐन दिवाळीच्या धामधुमीत काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर या दोन पदाधिकाऱ्यांना बोलावून घेण्यात आले आणि तेथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोघांचा प्रवेश करण्यात आला. हा प्रवेश होत असताना नवी मुंबईतील भाजपच्या एकाही स्थानिक नेत्याला ‘सागर’ बंगल्यावर पाचारण करण्यात आले नव्हते. कौशिक आणि शिंदे यांच्या प्रवेशाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण आणि ठाण्यातील विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर सोपविण्यात आली होती. या दोन नेत्यांना बंडापुर्वी दोन दिवस आधी कौशीक आणि शिंदे यांच्या भेटीसाठी थेट नवी मुंबईत पाठविण्यात आले होते. ही संपूर्ण यंत्रणा प्रदेश भाजपच्या काही निवडक नेत्यांकडून राबविण्यात आली असे सांगण्यात आले. काॅग्रेसचा जिल्हाध्यक्ष हाती लागत असल्याने स्थानिक नेत्यांना शेवटपर्यत याची कल्पना देण्यात आली नव्हती. अखेरच्या क्षणी उमेदवार मंदा म्हात्रे आणि पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांना या प्रक्रियेची कल्पना दिली गेली अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. ऐरोली मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर रिंगणात असलेले गणेश नाईक यांना याची कोणतीही खबरबात लागणार नाही याची दक्षता घेतली गेली होती असेही सुत्रांनी सांगितले. नाईक ऐरोलीतून भाजप उमेदवार असले तरी बेलापूर बाबत त्यांनी कोणतीही कठोर भूमीका घेतलेली नाही. त्यामुळे बेलापूरची रणनिती आखताना गणेश नाईकांना विश्वासात घेण्याचा प्रश्नही नाही अशी प्रतिक्रिया भाजपमधील एका नेत्याने लोकसत्ताला दिली.