जांभरून फाटा (जि. वाशीम ) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी विदर्भात दाखल झाली आहे. या यात्रेत त्यांच्यासोबत चालणाऱ्या यात्रेकरूंची निवासाची व्यवस्था कशी आहे, याबाबत लोकांमध्ये औत्सुक्य आहे. दरदिवशी नवीन मुक्कामाच्या ठिकाणी अवघ्या पाच तासांत एक गावच वसवले जाते. त्या ठिकाणी कंटेनर मध्ये राहुल गांधी यांच्यासह यात्रेकरूंचा मुक्काम असतो.
हेही वाचा… भारत जोडो यात्रेत बिरसा मुंडा यांचा आठव
राहुल गांधी आणि यात्रेतील सहभागी सर्वांची दिनचर्या ही पहाटे पाच वाजेपासून सुरू होते. साडेपाच वाजता ध्वजवंदन झाल्यानंतर यात्रेला सुरुवात होते. सकाळच्या सत्रात चालल्यानंतर दुपारच्या सत्रात विश्रांती असते. या वेळी राहुल गांधी हे विविध लोकांसोबत संवाद साधतात. विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरू होते. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी सहा डॉक्टरांचे पथक आणि दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या या ताफ्यात असलेल्या जवळपास ६० ते ६२ कंटेनर मध्ये २३० जणांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसभर २२ ते २५ किलोमीटरचे अंतर पायी चालत राहुल गांधी त्यांच्यातील उत्साह कायम कसा ठेवतात याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. राहुल गांधी हे मुक्काम कुठे करतात याबाबतही लोकांना औत्सुक्य आहे.
हेही वाचा… सुनील टिंगरे : युवकांमध्ये लोकप्रिय
क्रमांक एकच्या कंटेनरमध्ये राहुल गांधी हे मुक्कामी असतात. काही डब्यांमध्ये स्लीपिंग बेड, टॉयलेट आणि एअर कंडिशनर देखील बसवले आहेत. प्रवासादरम्यान तापमान आणि वातावरणात होणारा बदल लक्षात घेऊन अत्याधुनिक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राहुल गांधीच्या कंटेनरमध्ये मुक्कामी आहेत. त्यामध्ये फ्रिज, एक सोफा, टॉयलेट, बाथरूम, वातानुकुलित यंत्रणा. पंखा या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या खोलीच्या एका बाजूने महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचे छायाचित्र दर्शनी भागात लावलेले आहे. त्या समोरच सुरक्षारक्षकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते. रात्रीच्या विश्रांतीसाठी हे कंटेनर दररोज नवीन ठिकाणी एका गावाच्या आकारात उभे केले जातात. ही सर्व व्यवस्था उभारणीसाठी तब्बल पाच तास लागतात. राहुल गांधींसोबत राहणारे पदयात्री एकत्र जेवतील आणि जवळ राहतील अशी व्यवस्था केली गेली आहे. दुपारची विश्रांती रस्त्यालगतच्या तंबूत घेतात.
यात्रा विदर्भात आल्यामुळे आता वऱ्हाडी पद्धतीच्या जेवणावर भर आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी वांग्याची भाजी, पोळी, भात, वरण, बुंदी, ठेचा आदी पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू होती.