ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडीच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहीर केली. कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे ओळखले जात असून पाच वर्षांपुर्वी उमेदवारी मिळू न शकल्यामुळे त्यांची पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची संधी हुकली होती. परंतु यंदा त्यांना ही संधी मिळाल्याने कपील पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे असा सामना रंगणार असून त्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.
भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे. हा मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने भिवंडीच्या जागेवर दावा केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे भिवंडीच्या जागेचा तिढा कायम होता. अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला सोडण्यात आली असून या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहिर केली. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने ते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडेंविरोधात उभा केला तगडा उमेदवार
कोण आहेत सुरेश म्हात्रे ?
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा सुरेश म्हात्रे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. ते ठाणे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती होते. २०१४ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली असून यामध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ९३ हजार मते मिळविली होती. राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ते ओळखले जातात. पाच वर्षांपुर्वीच २०१९ मध्ये त्यांनी पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याटा चंग बांधला होता. त्यावेळी ते शिवसेना पक्षात होते. परंतु शिवसेना-भाजप युती असल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यांनी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. या निवडणुकीत हुकलेली संधी पुन्हा गमावायची नाही असे ठरवून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि या पक्षातून पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याची त्यांनी संधी अखेर मिळविली.