ठाणे : महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज होते आणि यातूनच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. या नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याचे काम काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू होते. त्यास नेत्यांना यश आल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सुरेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीला हजेरी लावली. यामुळे भिवंडीत शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे चित्र आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे हे निवडून आले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये याठिकाणी भाजपचे कपिल पाटील हे निवडून आले असे असले तरी याठिकाणी काँग्रेसच्या उमदेवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या मतदार संघात काँग्रेस पक्षाचे पारंपारिक मतदार आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला होता. परंतु महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडीची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज होते आणि यातूनच त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती. तसेच काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सुरेश म्हात्रे यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांचा प्रचार करणार नसल्याचे म्हटले होते. यामुळे भिवंडीत महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे चित्र होते. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भिवंडीतील नेत्यांमध्ये समेट घडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचबरोबर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून भिवंडीतील नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात येत होती. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी रात्री नाराज पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांची समजुत काढली असून यानंतर नाराज असलेले दयानंद चोरघे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सुरेश म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीला हजेरी लावली. असे असले तरी सुरेश टावरे मात्र गैरहजर होते. यामुळे भिवंडीत शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये अखेर मनोमिलन झाल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?
शक्तीप्रदर्शन
सुरेश म्हात्रे यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भिवंडीत शक्तीप्रदर्शन केले. गंगामाता मंदीर, साईबाबा मंदिर, धर्मवीर दिवंगत आनंद दिघे चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मंदाई गणपती मंदीर, दिवानशाह दरगाह, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जैनमंदीर मार्गे प्रांत कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर, अर्ज दाखल करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे उपस्थित होते. भिवंडी शहरात सुरेश म्हात्रे यांची ठिकठिकाणी गोदाम आहेत. या गोदामात हजारो कामगार काम करतात. या गोदामातील कर्मचारी देखील म्हात्रे यांना बळ देण्यासाठी शक्तीप्रदर्शनात सहभागी झाले होते.
हेही वाचा : लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत बुधवारी रात्री एक बैठक झाली. भिवंडी लोकसभा अनेक वर्षांपासून काँग्रेस लढवित आली आहे. ही जागा आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडे गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना होती.ॉ विधानसभा निवडणूकीत अन्याय होणार नाही असे पटोले यांनी आश्वासन दिले आहे.
दयानंद चोरघे, जिल्हाध्यक्ष, भिवंडी, काँग्रेस.