केंद्र सरकारच्या नवीन अग्नीपथ योजनेच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरूच आहेत. बिहारमध्ये केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे भाजपा आणि जनता दल युनायटेड या दोन मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जनता दल युनायटेडने अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी बिहार भाजपाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. बिहार भाजपाचे प्रमुख संजय जयस्वाल यांनी या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखले पाहिजे होते पण तसे झाले नाही. त्यामुळे हे एक षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जयस्वाल यांच्या आरोपांना उत्तर देताना जनता दल युनायटेडचे राजीव रंजन सिंग म्हणाले की “ज्या राज्यात त्यांची सत्ता आहे तिथे त्यांनी आंदोलकांवर कारवाई करायला हवी होती पण पोलिसांनी कारवाई का केली नाही ?”

गुरुवार आणि शुक्रवारी जनता दल युनायटेडच्या आंदोलकांनी नवाडा, मधुबनी आणि मधेपूरा येथील भाजपा कार्यलयासमोर निदर्शने केली. तसेच उपमुख्यमंत्री रेणू देवी, बिहार भाजपा प्रमुख संजय जयस्वाल आणि आमदार सी. एन गुप्ता यांच्या घराबाहेर देखील निषेध व्यक्त केला होता. या आंदोलनांनंतर बिहार सरकारने संजय जयस्वाल आणि रेणू देवी यांच्यासह बिहारमधील १० भाजपा आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना जयस्वाल म्हणाले की “आंदोलनानंतर प्रशासनाने दिलेली प्रतिक्रिया ही संशयास्पद वाटते आहे. मधेपूरा येथील भाजपाच्या कार्यलयाबाहेर सुमारे ३०० पोलीस तैनात करण्यात आले होते तरीही आमच्या पक्ष कार्यलयाची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मूक प्रेक्षकाची भूमिका पार पाडली. भाजपाच्या नवाडा येथील कार्यालयाबाहेरसुद्धा पोलीस उपस्थित होते मात्र तरीसुद्धा या कार्यलयाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे यामध्ये आम्हाला काही षडयंत्र दिसत आहे आणि हे उघड करणे आवश्यक आहे”. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेच गृह विभागाची जबाबदारी आहे. जयस्वाल पुढे म्हणाले की ” बिहारमध्ये सध्या जे घडतेय ते देशात इतरत्र कुठेही घडलेले नाही. आम्ही इथल्या सरकारचा घटक आहोत मात्र अश्या घटना थांबल्या नाहीत तर कोणाचेच भले होणार नाही”.

जयस्वाल यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना जनता दल युनायटेडचे राजीव रंजन सिंग म्हणाले की “भाजपाशासित राज्यांमध्ये भाजपाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. भाजपा नेत्यांना टार्गेट केले जात आहे हे त्यांना समजत नाही का ? संजय जयस्वाल यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे”. 

बिहारमध्ये भाजपा आणि जनता दल युनायटेड हे दोन मित्र पक्ष आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोन मित्रांमध्ये अनेक विषयांत मतभिन्नता आढळून आली आहे. बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा मंजूर करणार नाही अशी थेट केंद्र सरकारविरोधी भूमिका नितीशकुमार यांनी घेतली होती. त्यामुळे बिहारमध्ये भाजपा नितीशकुमार यांच्याशी असे जुळवून घेते हे राजकीय दृष्ट्या महत्वाचे असणार आहे.

Story img Loader