सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करून प्रचारात विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुळात उमेदवारीच कोणाला याबाबत तर्कवितर्क होत असल्याने हे प्रचार कार्यालय महायुतीचे असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्षांनी पक्षांतर्गत संघर्ष सुरू असल्याचेच सूचित केले. लोकसभा उमेदवारीसाठी विद्यमान खासदाराबरोबरच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही प्रयत्न सुरू केल्याने शिस्तबध्द असलेल्या भाजपलाही आता काँग्रेसचे वारे लागले आहे असेच मानले जात आहे. यामुळे उमेदवारी मिळणार त्याला विेरोधी पक्षाबरोबरच दोन हात करतांना गृहकलहालाही सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली लोकसभा मतदार संघामध्ये भाजपमध्येच आता उमेदवारीसाठी रस्साीखेच सुरू असून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पक्षांतर्गत पातळीवरून आव्हान दिले जात आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही उमेदवारीचा दावा केला असून त्यांनीही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसकडून पर्यायाने इंडिया आघाडीकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून त्यांनीही लोकसंपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : नगरमध्ये विखे-पाटील यांच्या साम्राज्याला आव्हान मिळणार का ? 

लोकसभा निवडणुका कधीही जाहीर होउ शकतील असे गृहित धरून इच्छुकांची तयारी सुरू आहे. विद्यमान खासदार पाटील तिसर्‍यांदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. दिवाळीपासून त्यांनी विविध भागाचा दौरा तर सुरू केला असून जिल्ह्यातील आपण काय केले हे सांगून पुन्हा एकदा संधी देण्याची मागणीही ते करीत आहेत. समाज माध्यमातून विविध ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाचे चित्रण प्रसारित करून मतदारांच्यात जाण्याचा प्रयत्न जसे खासदार करीत आहेत, तसेच इच्छुक असलेले देशमुखही करीत आहेत.

भाजपअंतर्गत उमेदवारीचा संघर्ष आता टोकाचा झाला आहे. सांगली लोकसभा मतदार संघामध्ये सांगली, मिरजेसह जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी आणि पलूस-कडेगाव या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. यापैकी तासगाव मतदार संघ हा विद्यमान खासदारांचा बालेकिा असून त्याठिकाणी जास्त ताकद खची करण्यापेक्षा त्यांनी जत, खानापूर-आटपाडी या मतदार संघातील दौरे वाढविले आहेत. जतच्या पूर्व भागासाठी म्हैसाळ सुधारित सिंचन योजना, टेंभू विस्तारित सिंचन योजना आणि महामार्गाचे निर्माण झालेले जाळे या जमेच्या बाजू घेउन ते मतदार संघात संपर्क साधत आहेत, तर विरोधकाकडून त्यांनी आतापर्यंत स्थानिक पातळीवर केलेल्या राजकीय कुरघोड्यांना उजाळा देउन पक्षांतर्गत विरोधही जबर असल्याचे निदर्शनास आणले जात आहे.

हेही वाचा : झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचा शपथविधी ते तृणमूल काँग्रेस, ‘आप’ची निदर्शने; दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, वाचा…

भाजपमध्ये उमेदवारीसाठी सुरू असलेल्या संघर्षाचेच भांडवल करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे विशाल पाटील यांच्याकडून केला जात आहे. अगोदर उमेदवार कोण हे ठरवा, मगच मैदानात या असे सांगून भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपमध्येही अंतर्गत गटबाजीतून वाढता विरोध ही खासदारांची डोकेदुखी ठरू पाहत असून त्याला कसे निस्तारणार हाही त्यांच्यापुढे प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसर्‍या बाजूला देशमुख हे आपल्याच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्‍वास व्ययत करीत विद्यमान खासदारांवर नाराज असलेल्यांना सोबत घेउन मतदार संघात दौरे करीत आहेत.

या निवडणुकीतही गतवेळीप्रमाणे तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनीही निवडणुकीची तयारी केली असून कोणत्याही पक्षांने उमेदवारी दिली नाही तर स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे सांगत आहेत. डबल महाराष्ट्र केसरीचे वलय घेउन ते ग्रामीण भागात बैलगाडी शर्यती, रक्तदान शिबीर या माध्यमातून तरूण मतदारांशी संवाद साधत आहेत. यामुळे गतवेळच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी जशी रंगत आणली तशीच यावेळीही रंगतदार निवडणुकीची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा : अर्थसंकल्पातून २०४७ पर्यंत विकसित भारताची गॅरंटी; पंतप्रधान मोदींच्या आगामी निवडणूक प्रचार धोरणांवर आधारित अर्थसंकल्प

निवडणुकीत पन्नास टक्के महिला मतदार असल्याने महिला मतदारांवरही भाजप व काँग्रेसने लक्ष्य केंद्रित केले आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून खास महिला वर्गासाठी हळदी कुंकूचे कार्यक्रम मोठ्या गावात आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने महिलासाठी खेळ, गाणी, होम मिनीस्टर सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. महिलांना संघटित करून हळदी कुंकूसोबत एखादे भांडे वाण स्वरूपात देउन महिलांच्या मनात अनुकूलता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये विद्यमान खासदारांच्या ज्योतीताई पाटील, स्नूषा शिवानी पाटील यांचे तर काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील व माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्या पत्नी ऐश्‍वर्या पाटील यांच्या उपस्थितीत सध्या ठिकठिकाणी महिलांचे संघटन सुरू आहेे.खासदारांच्याकडून वैजयंती फौडेशनच्या माध्यमातून तर विशाल पाटील यांच्याकडून मी सक्षमा या संघटनेच्या माध्यमातून गावोगावी या निमित्ताने महिला वर्गाशी महिलांच्या माध्यमातून संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bjp confusion about sangli lok sabha candidate raised due to chandrashekhar bavankule s statement print politics news css
Show comments