सुजित तांबडे

पुणे : भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या पुण्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा, महासंकल्प किंवा ठराव केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कर्नाटक निवडणुकांचा निकाल, पोटनिवडणुकांमधील अपयश, कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये बसलेले धक्के यामुळे घटत चाललेला जनाधार याचे चिंतन या बैठकीत झाले. सत्ता आल्यानंतर मशगुल झालेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर ‘जनतेमध्ये जा’ अशा शब्दांत कानपिचक्या दिल्याने ही बैठक म्हणजे ‘नड्डा गुरुजींच्या शाळेतील वर्ग’ ठरला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ‘माझ्याकडे वर्षभर कोणत्याही पदासाठी येऊ नका’ असे ठणकावून सांगितल्याने खुर्चीसाठी भाजपकडे येणाऱ्यांना थोपविण्याबरोबरच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही निर्वाणीचा इशारा दिला. त्यामुळे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची ‘शाळा’ झाली.

हेही वाचा… सुनील केदार यांना शह देण्यासाठी डॉ. आशीष देशमुखांची सावनेरमध्ये मोर्चेबांधणी

कर्नाटकच्या निकालाचा धडा मिळाल्यानंतर आगामी काळात राज्यात पक्षाने कशी व्यूहरचना आखायची, यासाठी राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. कसब्यात झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन पुणे’साठी वातावरण निर्मिती करण्याचीही या बैठकीमागील योजना होती. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांची तयारी कशी करायची, याचे नियोजन, काही संकल्प आणि ठराव, या बैठकीत होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात नड्डा यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करून त्यांना जागेवर आणण्याचे काम केले. खासदार, मंत्री आणि आमदारांची स्वतंत्र बैठक घेत त्यांनी सर्वांनाच वास्तवतेची जाणीव करून दिली, केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने राबविलेल्या योजना घरोघरी पोचविण्यासाठी देशभर ३० मे ते ३० जून दरम्यान ‘घर चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने जनतेमध्ये जा, असा सल्ला देत खासदार आणि आमदारांनी आपापल्या मतदार संघातील सर्व बुथ प्रमुखांच्या भेटी देऊन प्रत्येक बुथवरील किमान दहा ते पंधरा घरांना भेटी देण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वांच्याच डोळ्यावरील सत्तेची नशा उतविण्याचे काम नड्डा यांनी केले.

हेही वाचा… सीमाभागात एकीकरण समिती निष्प्रभ

लक्ष्याबाबत संभ्रम

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीच्या किती जागा मिळतील, हे जाहीर करण्यात संभ्रमावस्था राहिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत २०० हून अधिक जागा युतीला मिळतील, असे वक्तव्य केले. मात्र, पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना १५० जागांचे लक्ष्य असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नक्की किती जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.

हेही वाचा… मेट्रो, वीज प्रकल्पाच्या आडून नागपूरमधील भाजप नेत्यांची परस्परांवर कुरघोडी?

ठोस ठरावांचा अभाव

या बैठकीत काही ठराव करण्यात येणार असल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले होते. नड्डा गुरुजींनी केलेल्या कानउघाडणीनंतर आणि फडणवीस यांनी पदासाठी न येण्याचा दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर ठरावांचे सोपस्कार पार पाडण्यात आले. मात्र, त्यामध्ये ठोसपणा नव्हता.

हेही वाचा… स्वत:च पक्षांतर केलेले विधानसभा अध्यक्ष नार्वेकर करणार आमदार अपात्रतेवर निवाडा

कार्यकर्त्यांना बळ देणारी एक घोषणा

पक्षाचे कार्यकर्ते हे इनामेइतबारे काम करत असतात. त्यांना संधी देण्याचे काम पक्षाचे असते. त्यानुसार या बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्यादृष्टीने एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली, ती म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी पावणेदोन लाख विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याची. येत्या १५ दिवसांत या नेमणुका करण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्यादृष्टीने समाधान देणारा हा एकमेव निर्णय बैठकीच्या निमित्ताने झाला.

Story img Loader