महेश सरलष्कर
भाजपेतर विरोधकांच्या ऐक्याची पहिली कसोटी मानल्या गेलेल्या सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी ४ तर, भाजपने ३ जागा जिंकण्यात यश मिळाले. उत्तराखंडमध्ये ‘इंडिया’ला संयुक्त उमेदवार देता आला नाही. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली. उत्तरप्रदेश व झारखंडमध्ये मात्र ‘इंडिया’च्या ऐकीचा भाजपला मोठा फटका बसला. केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात लढले. या दोन्ही पक्ष ‘इंडिया’चे घटक पक्ष आहेत.
उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचे बलाढ्य नेते व आमदार दारासिंह चौहान यांनी ‘सप’ला रामराम करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राजीनामा दिल्याने इथे पोटनिवडणूक झाली. दलबदलू नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या चौहान यांनाच भाजपने उमेदवारी दिली. मात्र, ‘सप’च्या सुधाकर सिंह यांनी चौहान यांचा दणक्यात पराभव केला. हा पराभव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपराक देणारा ठरला असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा… कोकणात राणे बंधू विरुद्ध सामंत बंधू संघर्ष अटळ
या ओबीसीबहुल मतदारसंघामध्ये ‘सप’च्या उमेदवाराविरोधात उमेदवार न उभा करण्याचा निर्णय काँग्रेस तसेच, ‘इंडिया’चा भाग नसलेल्या बहुजन समाज पक्षानेही घेतला. त्यामुळे दलित मतेही सिंह यांना मिळाल्याचे मानले जाते. ‘इंडिया’तील ‘सप’ व काँग्रेस एकत्र आल्याचा फटका भाजपला सहन करावा लागला.
झारखंडमध्ये डुमरी विधानसभा मतदारसंघ राखण्यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाला (झामुमो) यश आले. झामुमोचे आमदार जगरनाथ महतो यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली. झारखंडमध्ये झामुमो व काँग्रेसची आघाडी असल्याने या मतदारसंघात महतो यांच्या पत्नी बेबी देवी या ‘इंडिया’च्या संयुक्त उमेदवार होत्या. इथे महतो समाजाचा प्रभाव आहे. बेबी देवी यांनी ऑल झारखंड स्टुडंट युनियनच्या (अजसू) उमेदवार यसोदा देवी यांचा १७ हजार १५६ मताधिकाऱ्यांनी पराभव केला.
हेही वाचा… पुण्यात नितेश राणे यांच्या दमदाटीच्या विरोधात अधिकारी एकवटले
पश्चिम बंगालमध्ये धुपगुढी मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली. २०२१ मध्ये भाजपने जिंकलेल्या ७७ जागांमध्ये धुपगुढीचा समावेश होता. तेव्हा, बिष्णूपदा रे यांनी तृणमूल काँग्रेसच्या मिताली राय यांचा पराभव केला होता. पण, रे यांच्या मृत्यूमुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तापसी राय यांना तृणमूल काँग्रेसच्या निर्मलचंद्र राय यांनी पराभूत केले. इथेही इंडियाच्या घटक पक्षांमध्ये युती झाली नाही. ‘माकप’ने तृणमूल व भाजपविरोधात उमेदवार उभा केला होता. ‘माकप’ला काँग्रेसने पाठिंबा दिला. तिहेरी लढतीतही तृणमूल काँग्रेसने बाजी मारली.
केरळमध्ये पुथ्थुपल्ली मतदारसंघ काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे राखला आहे. ओमान चंडी यांच्या निधनानंतर भावनिक लाट असल्याने त्यांचे पुत्र चंडी ओमान ३७ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी ‘माकप’च्या जॅक थॉमस यांचा पराभव केला. काँग्रेस नेते ओमान चंडी सलग १२ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. या मतदारसंघामध्ये ‘माकपच्या थॉमस यांचा तिसऱ्यांदा पराभव झाला. भाजपनेही व आम आदमी पक्षानेही उमेदवार उभे केले होते. या दोन्ही पक्षाचे अस्तित्व नगण्य असल्याने काँग्रेस आघाडी व डाव्या आघाडीने एकमेकांविरोधात निवडणूक लढवली. या मतदारसंघामध्ये ५० टक्के हिंदू मतदार असून ४० टक्के ख्रिश्चन आहेत.
उत्तराखंडमध्ये भाजपचे आमदार चंदन राम दास यांच्या मृत्यूमुळे झालेल्या बागेश्वर मतदारसंघामधील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी पर्वती दास विजयी झाल्या. इथे काँग्रेसचे बसंत कुमार मैदानात उतरले होते. इथे ‘इंडिया’ची एकी टिकली नाही. समाजवादी पक्षाने भगवती प्रसाद यांना उमेदवारी देऊन ‘इंडिया’च्या मतांमध्ये फूट पाडल्याचे मानले जात आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.
त्रिपुरामध्ये बोक्सानगर विधानसभा मतदारसंघ भाजपने ‘माकप’कडून हिसकावून घेतला. इथे ‘माकप’च्या सॅमसूल हक यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. ‘माकप’ने हक यांचे पुत्र मिझान हुसैन यांना उमेदवारी दिली, त्यांचा भाजपच्या तफज्जुल हुसैन यांनी पराभव केला. त्रिपुरामध्ये तफज्जुल हुसैन हे भाजपचे एकमेव मुस्लिम उमेदवार होते. धनपूर मतदारसंघ भाजपला राखण्यात यश आले असून इथे भाजपच्या बिंदू देबनाथ यांनी माकपच्या कौशिक नंदा यांचा पराभव केला. त्रिपुरामध्ये काँग्रेसने ‘माकप’ला पाठिंबा दिला होता. त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता असून टिपरा मोथा पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता तरीही भाजपचा उमेदवार विजयी झाला. धनपूर मतदारसंघाच्या आमदार प्रतिमा भौमिक यांनी राजीनामा देऊन खासदारकी कायम ठेवल्याने इथे पोटनिवडणूक घ्यावी लागली.