चंद्रपूर: चंद्रपूर राखीव मतदारसंघावरून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असा संघर्ष उफाळून आला असून काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध केला आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर व पाच इच्छुक उमेदवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे यासाठी धाव घेतली आहे. लोकसभेत भाजपाचा प्रचार करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांचा प्रचार कसा करायचा असा सवालही धानोरकर यांनी केला आहे.
चंद्रपूर मतदार संघावरून महाविकास आघाडीत घमासान सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) या पक्षासाठी सोडण्यात आली आहे. याला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला आहे. त्यांनी चंद्रपूरसाठी इच्छुक राजू झोडे, सुधाकर अंभोरे, गौतम नागदेवते, पवन भगत व अनिरूध्द वनकर यांना मुंबईला बोलावून घेतले. महिला काँग्रेस अध्यक्ष धोबे, माजी महापौर संगीता अमृतकर यांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यास विरोध दर्शवला.
हेही वाचा : Sonam Wangchuck : सोनम वांगचूक यांचे उपोषण मागे; लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळणार?
दरम्यान शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येणाऱ्या दिवंगत बाळू धानोरकर यांना या पक्षाची लोकसभेची उमेदवारी देण्यात शरद पवार यांची महत्वपूर्ण भूमिका होती. मात्र आता चंद्रपुूर मतदार संघ राष्ट्रवादीला देवू नका, अशी मागणी स्वत: दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लावून धरली आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार केला होता. त्यांच्यासाठी आम्ही मते कशी मागणार, असे धानोरकर यांनी पटोले यांना सांगितले. हा मतदार संघ काँग्रेसला सोडून बौध्द समाजाच्या युवकाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली. २०२९ मध्ये चंद्रपूर मतदार संघ खुला झाल्यावर बौध्द समाजाला संधी मिळणार नाही. त्यामुळे आताच संधी द्या असेही सांगितले.
जोरगेवार व विरोधक एकाच विमानात
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेसचे पाच इच्छुक उमेदवार बुधवारी सकाळी एकाच विमानाने मुंबईला गेले. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदार संघ सोडू नये अशी विनंती करण्यासाठी सर्व इच्छुक उमेदवार जात असल्याची माहिती जोरगेवार यांना विमानातच मिळाली. केंद्रीय पातळीवर चंद्रपूर राष्ट्रवादीला सोडण्याचे ठरले,.त्यामुळेच आता काँग्रेस नेते अखेरच्या क्षणी धावपळ करित आहेत असे इच्छुक उमेदवार अनिरूध्द वनकर लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले.