चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा आणि ‘चांदा ॲग्रो-२०२४’ कृषी महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन करून जनसंपर्क अभियान तथा मतपेरणीला सुरुवात केली. देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी यंदा भाजपकडून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व राज्याचे वनमंत्री मुनगंटीवार या दोन नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. अशातच, पालकमंत्री मुनगंटीवार यांनी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करून जनसंपर्क अभियानाला गती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता

२०२३ मध्ये मुनगंटीवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभेचे यशस्वी आयोजन केले. अयोध्येतील राममंदिरासाठी वापरण्यात आलेल्या काष्ठशिल्पाची भव्य शोभायात्रा, ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रम तसेच केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि भूपेंद्र यादव यांच्या लोकसभा आढावा दौऱ्यांचे यशस्वी आयोजनही त्यांनी केले. १६ डिसेंबर रोजी वरोरा तालुक्यातील खेमजई येथे केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ करून थेट मतदारांशी संपर्क साधला. गेल्या पंधरवड्यात २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मिशन ऑलिम्पिक’चे ध्येय ठेवून ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, त्यापाठोपाठ तीन ते सात जानेवारीदरम्यान ‘चांदा ॲग्रो-२०२४’ कृषी महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन करून मुनगंटीवार यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे चंद्रपुरात येऊन गेलेत. त्यांनीही मुनगंटीवार यांच्या कार्यपद्धतीचे तोंडभरून कौतुक केले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेल्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी, मुनगंटीवार यांना ‘संकटमोचक’ संबोधत त्यांच्याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्र मंजूर झाल्याचे सांगितले.

हेही वाचा : Uma Bharti: “मी अयोध्येत भाषणाला उभी राहिले आणि समोर बाबरी मशिदीवर…”, उमा भारतींनी सांगितला ६ डिसेंबर १९९२ चा तो प्रसंग!

या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मुनगंटीवार यांनी त्यांच्याकडील सांस्कृतिक खात्याचा पुरेपूर वापर करून घेतला. क्रीडा स्पर्धेत लेझर शो, फायर शो, गायिका शाल्मली खोलगडे हिचा लाईव्ह परफॉरमन्स, ‘एक शाम खिलाडीयों के नाम’, शिववंदना, गणेश वंदना, महाराष्ट्राची लोकधारा, कलर्स ऑफ इंडिया, असे भरगच्च कार्यक्रम मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आले. कृषी महोत्सवात विष्णू मनोहर यांच्या सात हजार किलोच्या खिचडीचा विश्वविक्रम रचला गेला. महापालिकेच्या माध्यमातून शाळा आणि शहरातील वस्त्यांमधील जवळपास ३५ हजार नागरिकांना या खिचडीचे वाटप करण्यात आले. बेला शेंडे व भरत गणेशपुरे यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह सरपंच परिषदेचे आयोजन करून जिल्ह्यातील बहुसंख्य गावातील सरपंचांशी मुनगंटीवार यांनी थेट संवाद साधला.

हेही वाचा : भंडाऱ्यातून परिणय फुकेंना लोकसभा उमेदवारीचे डोहाळे! ‘ट्विट’मुळे चर्चा

एकंदरीत २०२३ मधील भव्यदिव्य महोत्सवी कार्यक्रमांच्या आयोजनातून मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेत्यांसह सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून मुनगंटीवार यांनी मतपेरणीला सुरुवात केल्याचेही जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. गेल्या वेळी राज्यात युतीला सर्वत्र यश मिळाले होते पण अपवाद चंद्रपूरचा ठरला होता. यामुळेच यंदा मुनगंटीवार अधिक सावध झाले आहेत. लोकसभेसाठी भाजप कोणाला उमेदवारी देते यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur bjp leader sudhir mungantiwar organizing grand programs to secure votebank print politics news css