चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य भाजपसाठी अडचणीचा विषय ठरले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या चिमूर मतदारसंघांतही भाजप अनुक्रमे ४८ हजार व ३८ हजार मतांनी माघारीवर असल्याने हा प्रश्न पुढे आला आहे.
जिल्ह्यात आजघडीला भाजपचे दोन, काँग्रेसचे तीन व एक अपक्ष आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत भरघोस मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी झुंबड उडाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणिते वेगवेगळी असतात, असे सांगत काँग्रेसचे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत पुन्हा स्वतःकडे खेचून आणण्यासाठी भाजप नेते कामाला लागले आहेत.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?
लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसकडे ५८ हजार ९०३ मतांची आघाडी होती. भाजपला येथे विजय हवा असेल तर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते घेणारा उमेदवार द्यावा लागणार आहे. मात्र, सध्यातरी भाजपकडे असा उमेदवार नाही. भाजप उमेदवार मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर या गृहमतदारसंघात काँग्रेसने ४८ हजार मतांची आघाडी घेतली. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनाही विजयासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागणार, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राजुरा मतदारसंघात काँग्रेसला ५८ हजार ९०३ मतांची आघाडी होती. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर भाजपकडून माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर व देवराव भोंगळे ही तीन नावे चर्चेत आहे. यापैकी एकावर भाजपकडून डाव खेळला जाऊ शकतो. मात्र, येथेही विजय मिळवणे भाजपसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. कसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला ४० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी होती. आताही काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध भाजपकडे सक्षम उमेदवार नाही. यामुळे ब्रह्मपुरी मतदारसंघासाठी भाजपला ठोस रणनीती आखावी लागणार आहे.
हेही वाचा : बहुजन चेहरा महायुती, आघाडीच्या उमेदवारांचे राजकीय गणित बिघडवणार? गोंदियात प्रस्थापितांपुढे कडवे आव्हान
चिमूर मतदारसंघात काँग्रेसला ३८ हजार मतांची आघाडी होती. येथे विद्यमान आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, यावर विजयाचे समीकरण अवलंबून आहे. कारण, उमेदवारीमुळे नाराज झालेला काँग्रेसचाच एक गट भांगडिया आणि भाजपसाठी लाभदायी ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. वरोरा मतदारसंघात काँग्रेसला ४७ हजार मतांची आघाडी होती. हा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जातो, हे पाहावे लागेल. मात्र, येथेही महायुतीच्या उमेदवाराची कसोटीच लागणार आहे.