सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा विजयी करण्याची हमी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी रत्नागिकरांकडून घेतली खरी, पण खुद्द या मतदारसंघात त्यांच्या पक्षामध्ये असलेली गटबाजी या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली.

देशातील इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीमध्ये चांगली आघाडी घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘संपर्कसे समर्थन’ आणि ‘घर चलो अभियान’ राबवत आहेत. या अभियानांतर्गत ते संबंधित शहराच्या विशिष्ट भागात पक्षकार्यकर्त्यांसह रॅली काढून आगामी निवडणुकीत मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्याचं आवाहन स्थानिक नागरिकांना करतात. यामध्ये अनौपचारिकता आणि काही प्रमाणात नाट्यमयता आणण्यासाठी बावनकुळे रस्त्यावर भेटणाऱ्या नागरिकापुढे माईक धरुन, तुमचा पाठिंबा कोणाला, असं विचारतात. त्यांच्यासोबत घोषणा देणारा कार्यकर्त्यांचा घोळका, भगव्या टोप्या -झेंडे, ढोल-ताशा अशा एकूण भारलेल्या वातावरणात बहुसंख्य लोक मोदींचं नाव सांगून स्वतःची सुटका करून घेतात आणि मग जणू प्रत्यक्ष निवडणूकच जिंकल्याच्या आविर्भावात बावनकुळेंसह हा घोळका पुढे सरकतो. रत्नागिरीतही श्री राम मंदिर ते वीर सावरकर चौकापर्यंत हा सर्व ‘सोहळा’ यथासांग पार पडला. पण तसं करताना पक्षांतर्गत धुसफूस आणि गटबाजी काही झाकून राहिली नाही.

हेही वाचा… पंतप्रधान मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यामुळे राधाकृष्ण विखे यांचे भाजपमधील महत्त्व अधोरेखित

पक्षाच्या धोरणानुसार या कार्यक्रमाच्या आयोजनाची सूत्रे अलिकडेच नेमण्यात आलेले जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख माजी आमदार बाळ माने यांच्याकडे होती. त्यामुळे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील दुसरा गट दूर राहिला. रॅलीच्या प्रारंभी पटवर्धन आणि इतर काही प्रमुख मंडळींनी बावनकुळे यांची भेट घेऊन स्वागत केलं. पण त्यानंतर काढता पाय घेतला. त्यामुळे फक्त माने आणि त्यांच्या गटाचे कार्यकर्ते शिल्लक राहिले. पक्षसंघटना म्हणून ताकद कुठे दिसली नाही. पक्षाचे माजी नगरसेवक आणि दहा-बारा पदाधिकारी या कार्यक्रमापासून दूर राहिले. याआधी काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याचा मेळावा झाला तेव्हा वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशालाही या मंडळींनी धूप घातली नव्हती. अर्थात यापूर्वी पटवर्धन यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत हेच चित्र उलट दिसायचं. पण त्यामुळे अशा स्वरुपाच्या कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना ‘बूस्टर’ देण्याचा हेतू अजिबात साध्य झाला नाही.

हेही वाचा… कंत्राटी नोकर भरती रद्द केल्याने युवकांची नाराजी दूर करण्यात सत्ताधाऱ्यांना यश येणार का ?

आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपा आपला उमेदवार उभा करणार, की शिंदे गटाला, म्हणजेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांना पुढे चाल देणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. पण विधानसभेसाठी बाळ माने आत्तापासूनच जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता, युती तुटली तरच आहे. तरीसुद्धा या अभियानाच्या वातावरणनिर्मितीसाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून बऱ्यापैकी खर्च केल्याचं बोललं जातं. लोकसभा -विधानसभेचे उमेदवार ठरवताना यापैकी काहीही झालं तरी, ‘मोदींचे हात बळकट करायचे असतील तर’ ही गटबाजी पक्षाला परवडणारी नाही.

हेही वाचा… शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढ्यातच पक्षाची निर्नायकी अवस्था

मोदी नकोत, गडकरी हवेत

रत्नागिरीच्या राम आळी या जुन्या बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या या रॅलीत सुमारे सातशेपेक्षा जास्त नागरिकांकडून बावनकुळे यांनी मोदींच्या बाजूने कौल वदवून घेतला. बहुतेकांनी ‘मोदी, मोदी’ म्हणत प्रदेशाध्यक्षांचे कान तृप्त केले. पण येथील एक प्रतिष्ठित व्यापारी नीलेश मलुष्टे यांनी, ‘आम्हाला अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखं सर्वधर्मसमभाव जपणारं नेतृत्व हवं आहे’, असं स्पष्टपणे बजावलं आणि त्या दृष्टीने नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती दर्शवली.