छत्रपती संभाजीनगर : नांदेड, हिंगोली, परभणी या मतदारसंघात मतदान पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेली आकडेमोड एका बाजूला सुरू असताना पुढील टप्प्यातील लातूर आणि उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सभा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा अमित शहा यांची सभाही होणार आहे. सभांच्या धडक्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा १० मे रोजी म्हणजे प्रचार संपण्यापूर्वी घेण्याचे नियोजन शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्यानंतर म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा त्याच दिवशी व्हावी असे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा मंगळवारी होणार आहेत. धाराशिव शहरात २५ एकर जागेत ही सभा होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली. रविवारी लोकसभा निरीक्षक अजित गोपछेडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. धाराशिव शहरात सभेसाठी सहा हॅलिपॅड तयार करण्यात आले आहेत. सर्व केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित झाल्या आहेत. लातूर येथे गरुड चौक नांदेड वळण रस्त्यावरील ४० एकर मैदानावर ही सभा होणार आहे. मंडपात दोन लाख बसतील अशी सोय करण्यात आल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा : भाजपा नेत्यांनाही नकोयत ३७० खासदार!

छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांमध्ये कुरघोड्यांच्या खेळ होण्याची शक्यता आहे. १० मे रोजी राज ठाकरे यांची सभा मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांचीही सभा होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे प्रचार थांबविण्यापूर्वी उद्धव विरुद्ध राज अशी निवडणूक रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader