महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत यंदा मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक हे याठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. तसेच विद्यमान आमदार अबू आझमी यांनी चार वेळा याठिकाणाहून विजय मिळवलेला असताना त्यांच्यासमोर नवाब मलिक यांचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच या दोघांशिवाय महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते सुरेश पाटील यांच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे. कारण भाजपाने नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलिक आणि आझमी यांच्याशिवाय एमआयएम पक्षाचे अतीक अहमद खान हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. व्यावसायिक असलेल्या ४२ वर्षीय अतीक अहमद खान यांनी सांगितले की, यावेळी मुस्लीम मतदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता असून शिवसेनेचा उमेदवार जिंकण्याची शक्यता वाटते. याशिवाय इतर काही जणांनी येथे अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तविला आहे. विजय आणि पराजय यात केवळ दोन ते तीन हजार मतांचा फरक राहू शकतो, असेही सांगितले जाते.

अबू आझमी यांनी २००९ पासून तीन वेळा याठिकाणी विजय मिळविला आहे. २०१९ साली त्यांनी शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा २५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता.

हे वाचा >> Abu Azmi : अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार

मानखूर्द – शिवाजीनगरमध्ये तीन मुस्लीम उमेदवार रिंगणात असताना चर्चा मात्र अबू आझमी आणि नवाब मलिक यांचीच आहे. दोघांच्या राजकीय कारकि‍र्दीची सुरुवात समाजवादी पक्षातून झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद होते. १९९६ साली नवाब मलिक यांनी अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली नेहरू नगर येथून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला होता. पुढे आझमी यांचे राजकारणातील पदार्पण अपयशी ठरल्यानंतर आणि नवाब मलिक मंत्री झाल्यानंतर दोघांमध्ये संघर्ष उडाला. ऑक्टोबर २००१ साली अबू आझमी यांनी नवाब मलिक यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

गुन्हेगारी, अमली पदार्थाचे जाळे, बायोमेडिकल कचऱ्याचा प्रकल्पातून होणारे प्रदूषण, शिक्षण आणि वैद्यकीय याच्या अपुऱ्या सुविधा हे मानखूर्द – शिवाजी नगर मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. अबू आझमी हे प्रश्न सोडवू न शकल्यामुळे त्यांच्याविरोधात नाराजीची लाट आहे, त्याचाही परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. इम्रान सिद्दिकी नामक एका मजूराने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न अबू आझमी यांच्या विरोधात जाऊ शकतात. इथल्या लोकांच्या मदतीसाठी त्यांनी काहीही केलेले नाही. याउलट मतदारसंघात नशेचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येथे भीतीचे वातावरण आहे.

नवाब मलिक, अतिक खान आणि सुरेश पाटील यांनी मतदारसंघातील अमली पदार्थांच्या व्यापारावर चाप आणण्याचे आश्वासन दिले आहे.

सुरेश पाटील आणि अबू आझमी २०१४ सालीदेखील एकमेकांसमोर आले होते. तेव्हा आझमी यांचा केवळ १० हजार मतांनी विजय झाला होता. दुसरीकडे बाजूलाच असलेल्या अणुशक्ती नगर मतदारसंघातून नवाब मलिक दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. यावेळी त्यांची मुलगी सना मलिक याठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. पण बाजूच्या मानखूर्द – शिवाजी नगर मतदारसंघातून मागणी होऊ लागल्यामुळे नवाब मलिक यांनी मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा >> Shinde Shivsena Full Candidate List : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ८५ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

स्थानिक नागरिक मुस्तकीम अहमद यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी या मतदारसंघातून लढावे, अशी आमची इच्छा होती. तेच अबू आझमी यांना टक्कर देऊ शकतात. पण मलिक यांना मतदान करणे म्हणजे भाजपाला एकप्रकारे पाठिंबा दिल्यासारखे होईल. याला अनेकांचा विरोध असेल. त्यामुळे मलिक यांना किती मतदान प्राप्त होईल, याबाबत साशंकता आहे.

अबू आझमी यांनी मतदारसंघात बरीच कामे केली असल्याचे काही लोकांचे मानने आहे. तर काही मतदारांच्या मते एमआयएमचे उमेदवार स्थानिक असल्यामुळे त्यांनाच निवडणुकीत फायदा होईल, असे म्हटले जाते. आम्ही ज्या रस्त्याने जातो, त्याच रस्त्याने आमचा आमदार प्रवास करत असेल तरच आमच्या समस्या दूर होतील, असे शेख फय्याज आलम नावाच्या स्थानिक नागरिकाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. अतिक खान यांना इथल्या प्रश्नांची इतरांपेक्षा अधिक जाण आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In clash of titans nawab malik and abu azmi in muslim dominated shivaji nagar mankhurd seat shiv sena sena face fancies his chances kvg