प्रदीप नणंदकर, सुहास सरदेशमुख
लातूर, छत्रपती संभाजीनगर : ‘ साहेबांना जाऊन १२ वर्षे झाली आहेत,’ असे म्हणत दाटून आलेला अभिनेता रितेश देशमुख यांचा कंठ आणि व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांची भावना एकरूप झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पडझड लक्षात घेता लातूरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या. राजकीय मैत्र जपताना पक्ष वाढवणारे विलासराव अनेकांना हवेसे वाटत होते. त्या आठवणींच्या जागर झाला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.
अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे मराठवाड्याच्या काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाच्या वातावरणात विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन झाला. त्यामुळे काँग्रेसचे बळ वाढेल का आणि त्यासाठी नेतृत्व अमित देशमुख यांच्याकडे दिले जाईल का, हे प्रश्न अनुत्तरित असले तरी किमान काँग्रेस नेते एकवटल्याचे चित्रही काँग्रेसमधील कार्यकर्त्यांना दिलासा देणारे ठरणारे ठरले.
हेही वाचा… ‘भारतरत्न’ पी. व्ही. नरसिंह राव यांचा रामटेकमधील पुतळा अजूनही अनावरणाच्या प्रतीक्षेत !
काँग्रेसमधील कार्यक्रमांना सारे नेते एकत्र येण्याची प्रसंग तसे कमी आहे. उणीदुणी सांगावी कुणी, असे वाटणारे अनेक नेते असल्याने काहीजण गैरहजर राहतातच. पण दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावरील प्रेमामुळे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, विधानसभेतील गटनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे, विलासरावांचे मित्र उल्हासदादा पवार, माजी आमदार सुरेश वरपूडकर, आमदार अमीन पटेल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी अमित देशमुख यांनी आता पुढाकार घेऊन काम करायला हवे, असा आग्रह धरला. पक्ष वाढविण्याची मोठी संधी अमित देशमुख यांना मिळालेली असल्याने मराठवाड्यात ते नेतृत्व करू शकतील असे त्यांचे समर्थक करत होते. पडझडीच्या काळात पक्ष बदलणार नाही, असेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्याविषयी निर्माण केला जाणार संभ्रमही आता दूर झाला आहे. आपण आणि आपले १८ साखर कारखाने याशिवाय राजकीय ताकद कमविण्यासाठी अमित देशमुख यांना मोठी मेहनत घ्यावी लागेल, असे बहुतांश नेते सांगतात.
अमित देशमुख म्हणाले,‘सध्याचा काळ हा संघर्षाचा आहे. त्यामुळे निष्ठा, पक्ष, समाज याला अधिक महत्त्व आहे. विलासराव देशमुख यांनादेखील काँग्रेस पक्षातून बेदखल करण्यात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मला पक्षातून काढता, पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार ? त्यामुळे नाळ तोडून आज जी मंडळी इकडे-तिकडे फिरत आहेत ते महाराष्ट्रातील सामान्य लोकांना पटलेले नाही. पुन्हा एकदा यशवंतराव, वसंतदादा, वसंतराव नाईक यांनी काँग्रेस उभी केली होती, तशी काँग्रेस उभे करण्याची गरज आहे.’ पडझडीच्या काळात अमित देशमुख यांचे भाषण महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
हेही वाचा… चंद्रपूर जिल्हा भाजप कार्यकारिणीवर मुनगंटीवारांचे वर्चस्व, हंसराज अहीर समर्थकांना डावलल्याने नाराजी
विलासरावांचे मित्र उल्हासदादा पवार यांनी विलासरावांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आजही विलासराव देशमुखांची आठवण महाराष्ट्रभर निघते. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला आपण जातो, त्यावेळेला वारकरी म्हणतात, आज विलासराव असायला हवे होते, पुण्याच्या सवाई गंधर्वमध्ये अनेक गायक म्हणतात, ‘आज विलासराव असायला हवे होते’, रघुनाथ माशेलकरसारखे शास्त्रज्ञ म्हणतात, विलासराव असायला हवे होते. मतभेद असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे, पण मनभेद, व्यक्तिभेद, व्यक्ती द्वेष व सुडाचे राजकारण जर सुरू झाले की मांगल्य संपते . सध्या ही स्थिती आहे. विलासराव देशमुख असते तर आजची ही स्थिती राहिली नसती, असे यावेळी सांगण्यात आले.
आमदार विश्वजीत कदम यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितल्या. अडचणीत कुटुंबातला घटक असल्याप्रमाणे ते प्रेम देत असत. त्यामुळे विलासराव देशमुख आज असते तर कॉंग्रेसमध्ये भावनिक नाते निर्माण राहिले असते. माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी विलासराव देशमुख यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘पदाचा सन्मान कसा करायला हवा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख. मी त्यांच्या मुलाच्या वयाचा. मात्र, पालकमंत्री पदाची जबाबदारी मला दिल्यानंतर माझा योग्य तो सन्मान होतो आहे की नाही याची ते काळजी घेत असत. ते मला म्हणत, की मी जर तुमचा सन्मान केला तरच लोक तुमचा सन्मान करतील. लोकांना कळावे यासाठी मी अधिक काळजी घेत आहे . कार्यकर्त्यांना जपणारे नेतृत्व आज असण्याची गरज होती. विलासरावांच्या आठवणीच्या निमित्ताने काँग्रेसमधील कच्चे दुअे समोर आले आणि त्यावर काम करण्याचा संकल्पही निमित्ताने काहीसा पुढे सरकल्याचे चित्र दिसून आले.