मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी आधीच अर्धा डझन इच्छुकांमध्ये तीव्र स्पर्धा असताना आता शेतकरी मित्र म्हणून नावलौकिक असणारे आणि भाजप किसान आघाडीचे प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण हे नाशिक जिल्ह्यातील तीन आणि धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील तीन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातील भाजपचे विद्यमान खासदार आहेत. याआधी या मतदार संघातून सलग दोनदा ते निवडून आले आहेत. काही काळ केंद्रात संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही त्यांना यापूर्वी संधी मिळाली होती. आता तिसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरु केले असले तरी भाजपचे धक्कातंत्र येथे लागू झाल्यास त्यांची वाट बिकट आहे. याशिवाय डाॅ. भामरे यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी लपून राहिलेली नाही. भाजपमधील एका गटाने आधीपासूनच त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु केला आहे. डाॅ. भामरे मात्र उमेदवारीविषयी निश्चिंत असल्याचे सांगतात. निवृत्त पोलीस अधिकारी डाॅ. प्रतापराव दिघावकर हे भाजपमध्ये आल्याने दिघावकरांच्या रुपाने यावेळी नाशिक जिल्ह्याला संधी देण्यात यावी,असा आग्रह समर्थकांकडून करण्यात येत आहे. दिघावकर हे बागलाण तालुक्यातील रहिवासी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ज्ञानवापी परिसरात पहाटे दोन वाजता पूजा, काँग्रेससह इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षांचे मात्र मौन, नेमकं कारण काय?

धुळे मतदार संघातील भाजपच्या उमेदवारीसाठी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे या इच्छुक असल्याचे सांगितले जाते. देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष व नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. खासदार पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील मानले जात असल्याने देवरे यांच्या उमेदवारीसाठी ती बाजू बळकट म्हणावी लागेल. धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते, बागलाणचे डाॅ. विलास बच्छाव हेही भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मध्यंतरी मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्या निवासस्थानी भेट देत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. धुळ्यात काँग्रेस इच्छुकांमध्ये ज्या दोन, तीन नावांचा उल्लेख केला जात आहे, त्यात डाॅ. शेवाळे यांच्या नावाचाही समावेश आहे. अशा स्थितीत काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या भेटीवरुन भाजपला धुळ्यात काही धक्कातंत्राचा प्रयोग तर करावयाचा नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा : बावनकुळे यांच्या विधानाने सांगलीत उमेदवारीचा संभ्रम वाढला

धुळ्यात भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वच इच्छुकांनी मतदार संघाचा दौरा, गाठीभेटींवर भर देणे सुरु ठेवले आहे. इच्छुक व त्यांच्या समर्थकांकडून ठिकठिकाणी फलकबाजी करुन वातावरण निर्मिती केली जात आहे. अशातच आता भाजप किसान आघाडीचे प्रदेश महामंत्री बिंदूशेठ शर्मा यांनी मालेगाव आणि धुळ्यात पत्रकार परिषदा घेत शेतकरी नेता म्हणून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे जाहीर केल्याने इच्छुकांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule competition among the bjp leaders to get ticket for dhule lok sabha election 2024 print politics news css
Show comments