धुळे : भाजपकडून लागोपाठ तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवला असताना महाविकास आघाडी मात्र अजूनही आपला उमेदवार निश्चित करु शकलेली नाही. विशेष म्हणजे, आघाडीचा उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपलाही पुढील रणनीती आखता आलेली नाही.
धुळे लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीतर्फे धुळ्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. प्रबळ उमेदवाराच्या शोधात काँग्रेस घुटमळली आहे. काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसची पंचाईत झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान धुळे येथे महिलांसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता शिंदे यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, मालेगावचे डॉ. तुषार शेवाळे हेदेखील उमेदवारीच्या स्पर्धत आहेत.
हेही वाचा : सांगलीत शिवसेना – काँग्रेस दोघांचीही घालमेल
सनेर हे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याआधी पराभूत झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून त्यात धुळे जिल्ह्यातील तीन आणि नाशिक जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये भाजप तसेच काँग्रेसचे उमेदवार हे धुळे जिल्ह्यातील होते. भाजपचे विद्यमान उमेदवारही धुळ्यातील असल्याने काँग्रेसकडून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील उमेदवाराच्या बाजूने कौल देण्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान,’एमआयएम’नेही उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहे. मतदार संघात भाजप वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणे अपेक्षित असले तरी एमआयएमने उमेदवारी केल्यास भाजपच्या दृष्टीने ते हितकारक असेल, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा : सोलापूरमध्ये ‘उपऱ्या’वरूनच भाजपच्या सातपूते यांची कोंडी
धुळे लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्यात आली असली तरी मी किंवा पत्नी अश्विनी पाटील उभे राहणार नाही. पक्षश्रेष्टी ज्यांना उमेदवारी देणार, त्यांच्या प्रचारासाठी आम्ही संपूर्ण मतदार संघात ताकद लावून निवडून आणू.
आमदार कुणाल पाटील (कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस)