मालेगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपकडे असलेल्या धुळे मतदार संघावर दावा सांगणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचा नुकताच मालेगावात मेळावा पार पडला. महायुतीच्या जागा वाटपात धुळ्याची जागा शिंदे गटाकडे घेऊन आविष्कार भुसे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रही सूर मेळाव्यात लावण्यात आला. आविष्कार हे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आहेत. हा मेळावा आणि शिंदे गटाचा एकूणच पवित्रा बघता ही जागा सोडावी लागते की काय म्हणून भाजपच्या स्थानिक वर्तुळात मात्र धाकधूक वाढली आहे.

लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या धुळे मतदार संघात तीन निवडणुकांपासून भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. तत्पूर्वी प्रताप सोनवणे यांनी येथून भाजपच्या विजयाची पायाभरणी केली होती. डाॅ. भामरे हे तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्याचवेळी नाशिकचे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, शेतकरी नेते बिंदूशेठ शर्मा, धुळे जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते, माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव अशा अर्धा डझनहून अधिक इच्छुकांची भाजपमध्ये उमेदवारीसाठी धडपड सुरु आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. देवरे या भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा नवसारीचे खासदार सी. आर. पाटील यांच्या कन्या आहेत. अशा तऱ्हेने इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे यावेळी भाजपमध्ये आधीच उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाली असताना मित्र पक्ष शिंदे गटानेही काही दिवसापासून या जागेवर दावा सांगणे सुरू केले आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा : चावडी: मंडप सजलाय, पण नवरदेवाचाच पत्ता नाही ! 

धुळ्याच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिंदे गटाने मंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला आहे. ‘अबकी बार आविष्कार’ असे म्हणत भावी खासदार अशी त्यांची छबी समर्थकांकडून निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी समाज माध्यमांचा पद्धतशीर वापर करण्यात येत आहे. शिवाय या समर्थकांकडून ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या फलकबाजीद्वारे वातावरण निर्मिती होत आहे. आविष्कार हे तरुणांमध्ये लोकप्रिय असून नाशिकसह धुळे जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. लोकांच्या समस्या सोडविणे आणि विकास कामे मार्गी लावणे, यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याने त्यांच्या रुपाने महायुतीला धुळ्याची जागा जिंकणे सहज सुलभ होईल, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे.

हेही वाचा : बांसुरी स्वराज यांना लोकसभेची उमेदवारी, ‘घराणेशाही’च्या मुद्द्यावरून विरोधकांकडून भाजपाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न!

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात २५ जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी ३२ पर्यंत जागा लढविण्याचा निर्धार भाजप पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. अशा स्थितीत सलग तीन वेळा विजय मिळालेली धुळ्याची जागा भाजप कदापि सोडणार नाही, असा एक अंदाज आहे. दुसऱ्या बाजूला मंत्रिपुत्रासाठी शिंदे गटाकडून धरण्यात येणारा आग्रह आणि मंत्री दादा भुसे यांची खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली जवळीक, यामुळे ही जागा कदाचित मित्र पक्षाला जाऊ शकते,अशी धास्ती स्थानिक पातळीवरील भाजप गोटात आहे.

हेही वाचा : आमदार संग्राम थोपटे नक्की कोणासोबत ?

भाजपमध्ये गटबाजीचे दर्शन

धुळ्याची जागा पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने सक्रिय झालेल्या शिंदे गटात एकवाक्यता दिसत असताना उमेदवार निश्चितीवरुन भाजप पक्षांतर्गत मात्र परस्परविरोधी मतप्रवाह असल्याचे चित्र आहे. इच्छुकांच्या चाचपणीसाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांनाही भाजपमधील या गटबाजीचे दर्शन घडले. कोण व कसा उमेदवार हवा, यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा जाणून घेणे, हा पक्ष निरीक्षकांच्या दौऱ्यामागील हेतू होता. मात्र पक्ष निरीक्षकांना भेटण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नावांची जी यादी बनविण्यात आली होती, त्या यादीलाच अनेकांनी आक्षेप घेतला. जुने जाणते व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलत विशिष्ट लोकांचीच या यादीत वर्णी लावण्यात आली, असा आरोप करण्यात आला. पक्षातील एका गटाने संघटनात्मक हस्तक्षेप करत हे षडयंत्र रचल्याची टीकाही दुसऱ्या गटाने केली. पक्ष निरीक्षकांना भेटण्याची संधी डावलली गेल्याच्या नाराजीतून आक्रमक झालेल्या काही पदाधिकाऱ्यांकडून आरडाओरड व आदळआपट झाल्याने पक्षनिरीक्षक थांबलेल्या हाॅटेलच्या बाहेर मोठा गोंधळ उडाला. हा विरोध बघता अखेर नाराज पदाधिकाऱ्यांची नावेही या यादीत समाविष्ट करावी लागली. त्यानंतर गोंधळाचे वातावरण शमल्याचे सांगण्यात आले.

धुळ्याची जागा शिंदे गटाकडे घेण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी युवा सेनेने आयोजित केलेल्या मेळाव्याप्रसंगी शिवसेनेच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आविष्कार भुसे यांच्यासाठी ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. त्या अनुषंगाने मतदारसंघातील मित्रपक्षांच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाईल. त्यानंतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेण्यात येणार आहे.

ॲड. संजय दुसाने (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट)

Story img Loader