धुळे : जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) स्वपक्षीय नाराज पदाधिकाऱ्यांमुळे त्रस्त झाली असून पक्षाच्या महेश मिस्तरी आणि हिलाल माळी या सहसंपर्कप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना साथ देणाऱ्या माळी आणि मिस्तरी यांच्याबरोबर अनेक शिवसैनिक ठाकरे गटातून बाहेर पडल्याने याचा फटका धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या मतदारसंघात महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे शहर मतदारसंघातून ठाकरे गटाशी कोणताही संबंध नसताना ऐनवेळी अनिल गोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने ३९ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत महेश मिस्तरी यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने त्यांच्यावर धुळे आणि साक्री या तालुक्यांचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवलेली होती. धुळे शहर मतदारसंघातून उमेदवारीसाठी मिस्तरी हे इच्छुक होते. परंतु त्यांना डावलून गोटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने संतप्त मिस्तरी यांनी थेट पक्षातून बाहेर पडून बंड करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा ; तनवाणी यांची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटाची पंचाईत

u

मिस्तरी यांच्यानंतर धुळे तालुका सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी असलेले माजी नगराध्यक्ष हिलाल माळी यांनीही ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. माळी हे ३५ वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. धुळे ग्रामीण मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत धुळे ग्रामीणची जागा भाजपला गेल्याने धुळे शहर मतदारसंघातून माळी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु युतीचा उमेदवार असतानाही भाजपकडून अपक्ष उमेदवारास मदत करण्यात आली. त्याचा माळी यांना फटका बसल्याने त्यांचा पराभव झाला होता.

या निवडणुकीत धुळे ग्रामीणमधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा माळी बाळगून होते. परंतु जागावाटपात धुळे ग्रामीण मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला गेल्याने माळी यांनी नाराजी व्यक्त करून ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. धुळे ग्रामीणमधून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा ; जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप

महाविकास आघाडीत अस्वस्थता

धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांत ठाकरे गटाच्या दोन कट्टर निष्ठावंतांनी बंड करण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मविआकडून धुळे शहर मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनिल गोटे तर, धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे उमेदवार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dhule uddhav thackeray shivsena leaders mahesh mistari and hilal mali resigned print politics news css