अविनाश पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक – देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या दिंडोरीत महायुतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात लढत होणार आहे. भगरे हे शिक्षक आहेत. या जागेसाठी आग्रही माकप आणि मतदार संघाचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केलेले भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचीही उमेदवारीसाठी तयारी सुरु आहे.

दिंडोरीच्या जागेवर उमेदवार निश्चित करताना दोन्ही प्रमुख पक्षांनी बरीच खबरदारी घेतली. भाजपने कोणता समाज वा घटक नाराज आहे का, इथपर्यंत चाचपणी केली होती. बहुसंख्यांक शेतकरी मतदार असणाऱ्या या मतदारसंघाविषयी शरद पवार यांना नेहमीच स्वारस्य राहिले आहे. परंतु, राष्ट्रवादी एकसंघ असतानाही तो त्यांच्या हाती लागला नाही. आता नव्या मित्रांच्या सोबतीने त्यांनी समीकरणांची जुळवाजुळव चालवली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले. केंद्रीय राज्यमंत्र्यांशी लढत देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अनेक दिवस काथ्याकूट केल्यानंतर शिक्षकाला मैदानात उतरवले. ’एमबीबीएस‘चे शिक्षण घेतलेल्या डॉ. भारती पवार या तशा मूळच्या राष्ट्रवादीच्याच. शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि आठ वेळा आमदार राहिलेले दिवंगत ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा. जिल्हा परिषदेच्या त्या सदस्य होत्या. राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१९ मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत सुमारे दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. केंद्रीय आरोग्य खात्याचे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. दिंडोरी हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. भाजपमधून अनेक इच्छुक होते. तथापि, दुसऱ्यांदा तिकीट मिळवण्यात डॉ. पवार यशस्वी ठरल्या. दिंडोरीत सर्व आमदार महायुतीचे आहेत. त्यातील चार तर एकट्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील आहेत. त्यामुळे या लढतीला महायुती-महाविकासपेक्षा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील संघर्षाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

हेही वाचा >>>अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

भाजपचे तीनवेळा खासदार राहिलेले हरिश्चंद्र चव्हाण आणि विधानसभा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी धडपड केली होती. त्यांना नाकारून शरद पवार यांनी पिंपळगाव बसवंतच्या कन्या शाळेतील शिक्षक भास्कर भगरे यांचे नाव निश्चित केले. भाजपच्या डॉ. भारती पवार यांना राजकीय घराणेशाहीचा वारसा आहे. भगरे यांना तसा कुठलाही वारसा नाही. एम.ए., बी.एड. हे त्यांचे शिक्षण. दिंडोरीतील गोंडेगावचे सरपंच, पंचायत समितीत सभापती- उपसभापती, जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेल्या भगरेंना थेट लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाली. या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने ५५.९ टक्के मते मिळवून विजय मिळवला होता. तेव्हा एकसंघ राष्ट्रवादीला ३२.७ टक्के मते मिळाली होती. त्यापुढील २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी ५०.३ टक्क्यांवर आली. राष्ट्रवादीची टक्केवारी ३०.४ पर्यंत घसरली. माकपला ९.७ टक्के तर वंचित बहुजन आघाडीने ५.२ टक्के मते मिळाली होती. मागील दोन्ही निवडणुकीत भाजपने मोठ्या फरकाने राष्ट्रवादीला पराभूत केले होते. यावेळी महाविकास आघाडीत माकप या जागेसाठी आग्रही होती. मात्र, पवार यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांना पाठबळ देण्याची भूमिका मांडून आपला उमेदवार जाहीर केल्याने माकपच्या गोटात नाराजी आहे. माकप, भाजपचे माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या निर्णयानंतर मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dindori mahavikas aghadi bhaskar bhagre contesting against bjp dr bharati pawar print politics news amy