डोंबिवली : राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असताना रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपच्या गोटात सहभागी होणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील दबंग नेत्यांनी आता पक्षाला रामराम सुरु केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना चव्हाण यांच्या जवळ असणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांनी तेव्हाच्या एकसंघ शिवसेनेचा मार्ग धरला होता. राज्यातील बदललेल्या राजकीय समिकरणात भाजपला सत्तेत स्थान मिळाले असले तरी ठाणे जिल्ह्यात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत यांचा दबदबा वाढला आहे. शिंदे पिता-पुत्रांपुढे भाजपच्या स्थानिक नेत्यांना मिळत असलेले दुय्यम स्थान लक्षात घेऊन भाजपच्या वळचणीला असलेले दबंग नेते पक्षापासून दूर जाऊ लागले असून शिंदे सेनेत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत.
सुजाण, सुसंस्कृत नागरिकांचा रहिवास असलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत गेल्या काही वर्षात बेसुमार अशी बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे पोसणारी एक राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था या भागात उभी राहीली असून शेकडोंच्या संख्येने सोयी सुविधांची आरक्षणे या मंडळींनी गिळंकृत केली आहेत. बेकायदा वस्त्या, इमारतींमधून उभारली जाणारी घरे विकून कोट्यधीश झालेली आणि या पैशातून स्वत:चे बालेकिल्ले उभे करणारी राजकीय व्यवस्था आता डोंबिवलीकरांना नवी राहीलेली नाही. मोकळया जागा बळकावून चाळी, इमारती उभी करताना राजाश्रयाच्या शोधात काही ठराविक राजकीय नेते राज्यात सत्ता असलेल्या पक्षांच्या वळचणीला जातात हा इतिहास नवा नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असताना कल्याण डोंबिवलीतील असे अनेक गल्ली नेते या पक्षाच्या आश्रयाला आले होते. कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेला धक्का देण्यासाठी या नेत्यांचा पुरेपूर वापर भाजपने केला. गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे हे दबंग नेते एकमागोमाग एक या पक्षाला रामराम करु लागले असून मंत्री रविंद्र चव्हाणही शांतपणे हा बदल अनुभवत असल्याने येथील राजकीय वर्तुळात या संक्रमणाची खमंग चर्चा सुरु झाली आहे.
हेही वाचा : भाजपला रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडीत वादच सुरू
विकासाचे रडगाणे, राजाश्रयाची आस
डोंबिवलीतील भाजपचे गरीबाचापाडा प्रभागाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी नुकताच त्यांच्या पत्नीसह पक्षाचा राजीनामा दिला. या म्हात्रे यांनी महापालिकेचे स्थायी समिती पदही उपभोगले होते. रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशी त्यांची एकेकाळी ओळख होती. घाईघाईने त्यांनी दिलेला राजीनामा अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या प्रभागतील मातब्बर नेते म्हणून म्हात्रे ओळखले जातात. भाजपमध्ये दाखल झाल्यापासून ते अस्वस्थ असल्याची चर्चा होती. ते मुळचे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. डोंंबिवली पश्चिमेत हक्काचे दोन प्रभाग सांभाळून असणारे विकास म्हात्रे हातोहात सोडून देणे भाजपला परवडणारे नव्हते. त्यामुळे म्हात्रे यांची नाराजी विकास कामांसाठी, काँक्रीट रस्ते कामांसाठी निधी देऊन मंत्री चव्हाण यांनी वेळोवेळी दूर केली. डोंबिवलीत कोणालाही मिळाला नाही एवढा विकास कामांचा निधी भाजपने विकास म्हात्रे यांना दिला. गरीबाचापाडा भागातील प्रशस्त काँक्रीट रस्ते, सुस्थितीत पदपथ,गणेशघाट, पथदिवे त्याचे उत्तम उदाहरण आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वर्तुळातील माजी नगरसेवक फोडण्यासाठी टपून बसलेले शिंदे गटाचे नेतेही विकास म्हात्रे यांना जाळण्यात ओढण्यासाठी प्रयत्नशील होते अशी चर्चा आहे. असे असताना म्हात्रे यांनी दिलेला राजीनामा सध्या चर्चेत आहे.
बेकायदा नगरी
डोंबिवली पश्चिम बेकायदा बांधकामांची नगरी म्हणून ओळखली जाते. या नगरीतील कुंभारखाणपाडा, राजूनगर, गरीबाचापाडा, गणेशनगर भागात टोलेजंग बेकायदा इमारतींची कामे सुरू आहेत. शहराच्या इतर भागात अशीच बेकायदा बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी कारवाई करताना कचरतात. या भागात बेकायदा बांधकामे, उद्योगांना अभय देण्यासाठी खास राजकीय यंत्रणाच तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे वरदहस्त असलेल्यांची बेकायदा बांधकामे तुफान वेगाने सुरू आहेत. मंत्री रविंद्र चव्हाण हल्ली अशा स्थानिक नेत्यांपासून फारकत घेऊन वावरु लागले आहेत. त्यामुळे बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी भाजपमध्ये स्थानिक पातळीवर कोणी वाली नाही. या उद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची मात्र यामुळे कोंडी झाली आहे. अशाच अस्वस्थतेतून विकास म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा आहे.