Nagpur East Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीत जागावाटपावरून असंतोष उफाळून आला आहे. नागपूरमधील ३ मतदारसंघात उमेदवारनिश्चित करण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. यातच पक्षाचा परंपरागत पूर्व नागपूर मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासाठी सोडण्यात आल्याने काँग्रेसमधील इच्छुक नाराज झाले आहेत.
पूर्व नागपूरमधून काँग्रेसच लढणार, असेच आजवरचे चित्र होते. राष्ट्रवादी व शिवसेनेने यावर दावा केला असला तरी या दोन्ही पक्षाकडून यासाठी विशेष जोर लावला जात नव्हता. त्यामुळे काँग्रेस नेतेही निश्छिंत होते. या पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. नेत्यांनीही अनेकांना आश्वासने देऊन ठेवली आहे. यात २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात ८० हजारावर मते घेणारे पुरुषोत्तम हजारे यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीला जागा सुटल्याने बंडाचे निशाण फडकावलं आहे.
हेही वाचा…परंडा व पैठण मतदारसंघांत ठाकरे गटात पेच
पूर्व नागपूरमधून काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यापूर्वी सलग चार वेळा निवडून आले होते. सध्या भाजपचे कृष्णा खोपडे तेथील विद्यमान आमदार आहेत. ते सुद्धा येथून तीन वेळा निवडून आले आहेत. चतुर्वेदी यांचा विक्रम तोडण्यासाठी भाजपने त्यांना चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे.२०१९ च्या निवडणुकीत खोपडे विरुद्ध हजारे असा सामना रंगला होता. हजारे नगरसेवक होते. त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने खोपडे एकतर्फी विजयी होईल असा, अंदाज बांधला जात होता. एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येऊ असा दावाही खोपडे करीत होते. मात्र, प्रत्यक्षात हजारे यांनी चांगलीच मुसंडी मारली. तब्बल ८० हजार मते त्यांनी घेतली. खोपडे २३ हजार मतांनी निवडून आले. मतदारसंघात मेहनत केल्यास खोपडेंचा पराभव शक्य आहे हे लक्षात घेऊन हजारे मागील पाच वर्ष मतदारसंघाच्या संपर्कात आहे. चतुर्वेदी यांच्यासह शहरातील इतर नेत्यांसोबतही त्यांनी जुळवून घेतले होते. काँग्रेसही त्यांना उमेदवारी देण्याबाबत गांभीर्याने विचार करेल, असे त्यांना वाटत होते. काँग्रेसच्या इतर इच्छुकही स्पर्धेत होते व त्यांनी लाखो रुपये खर्चसुद्धा केले.पण अचानक हा मतदारसंघच काँग्रेसच्या हातून गेल्याने त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या हजारे यांनी कोणालाही न विचारता उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा…Congress NCP Nomination Applications : यादी जाहीर होण्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज
महायुतीतही बंड
महायुतीत ही जागा भाजपकडे आहे. पक्षाने तेथे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ते शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहे, मात्र त्यापूर्वीच महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्या आभा पांडे यांनी पूर्व नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.