सुमित पाकलवार
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यांच्यासोबत गेलेले गडचिरोली येथील आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्रिपद आत्राम यांना मिळणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेत्यांना होता. परंतु त्यांना शेजारच्या गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असून स्थानिक नेत्याला संधी न देता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्रीपद ठेऊन भाजपने राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची चर्चा आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून अहेरी विधानसभेची ओळख आहे. काही अपवाद वगळता येथील आत्राम राजघराण्याकडे कायम सत्ता राहिली आहे. अशात तब्बल दोन वेळा सलग पराभव वाट्याला आल्यानंतरदेखील २०१९ विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांचे पुतणे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे यापूर्वी दोनदा मंत्रीपदी राहिलेल्या धर्मरावबाबांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल याची सर्वांनाच खात्री होती. मात्र, ऐनवेळेवर त्यांचे नाव मागे पडले. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद भूषवले. त्यानंतर घडलेल्या सत्तानाट्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून महायुतीत सामील झाला. त्यात धर्मरावबाबा आत्राम हे देखील होते. त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद देत अन्न व औषध प्रशासन सारखे महत्त्वाचे खाते दिले गेले. हे जिल्ह्याला मिळालेले पहिलेच कॅबिनेट मंत्रीपद आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीतील फुटीनंतर ऊस तोडणी दराबाबतच्या चर्चेला नवे वळण
निवडणुकीत धर्मरावबाबांनी यापुढे विधानसभा लढणार नसल्याचे जाहीर करून कार्यकर्त्यांना लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. बऱ्याचदा त्यांनी आपल्या भाषणातदेखील लोकसभा लढण्याचे सूतोवाच केले आहे. परंतु वर्तमानात भाजपचे खासदार अशोक नेते गडचिरोली-चिमूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे बाबांच्या दाव्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. असे झाल्यास निवडणुकीदरम्यान जागावाटपात महायुतीत संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप नेतृत्वाला हे चांगलेच ठाऊक असल्याने धर्मरावबाबांना गडचिरोलीचे पालकमंत्रीपद न देता शेजारच्या गोंदियाची जबाबदारी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे होणारे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे. धर्मबाबा आत्राम जिल्ह्याच्या राजकारणात वरचढ ठरणार नाहीत याची भाजप नेतृत्वाने पुरेपूर खबरदारी घेतली आहे. एकूणच आत्राम यांची कोंडी करण्यावरच भाजपचा भर दिसतो.
हेही वाचा… ग्वाल्हेरमध्ये प्रचारासाठी ‘शिंदे’ महाराज जमिनीवर
पालकमंत्रीवरून विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षात आणि सरकारमध्ये मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ते सतत व्यस्त असतात. परिणामी ते पालकमंत्री म्हणून गडचिरोलीला वेळ देऊ शकत नाही आहे. काही महत्त्वाचे प्रसंग वगळता ते जिल्ह्यात आले नाही. यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. रस्त्यांची समस्या असो की रिक्तपदांची, यामुळे सर्व सामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. अशा स्थितीत पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नसल्याने प्रशासनावर परिणाम होतो. यावर विरोधकांनी देखील टीकेची झोळ उठवली असून जिल्ह्यात पूर्णवेळ देणारा स्थानिक नेता असताना उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वतःकडे का ठेवले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.