गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसंदर्भात भाजपचे निरीक्षक खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री रणजित पाटील यांनी गडचिरोलीत भाजप पदाधिकारी आणि नेत्यांची मते जाणून घेतली. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोली-चिमूरमधून उमेदवारी मिळणार, याचीच अधिक चर्चा होती.
मागील काही महिन्यांपासून गडचिरोली-चिमूर लोकसभेसाठी महायुतीकडून धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिली जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आत्राम यांनीही अनेकदा आपण लोकसभा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपचे निरीक्षक खासदार बोंडे आणि माजी मंत्री पाटील गडचिरोलीत आले होते. त्यांनी उमेदवारीबाबत जिल्ह्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. जिल्हाभरातील नेते व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. परंतु यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांना भाजपच्या चिन्हावर लोकसभा लढण्याबाबत विचारण्यात आल्याची आणि भाजप गडचिरोलीसाठी उमेदवार बदलणार, अशी चर्चा दिवसभर विविध माध्यमांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे बैठकीला आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे, विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या समर्थकांनी अशा चर्चांमध्ये तथ्य नसून उमेदवारी नेतेंनाच मिळणार, असा दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : बच्चू कडू यांचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी महायुतीची धडपड
अम्ब्रीशराव आत्रामांची पुन्हा दांडी!
जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री अम्ब्रीशराव आत्राम याहीवेळी पक्षाच्या बैठकीला गैरहजर होते. मागील काही दिवसांपासून ते पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना सतत गैरहजर राहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यातही ते दिसले नाहीत. यामागे त्यांचे काका धर्मरावबाबा आत्राम यांना महायुतीत मिळालेले मंत्रिपद असल्याचे बोलले जाते. अहेरी राजघराण्यातून येणारे अम्ब्रीशराव आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे काका-पुतणे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांना जेव्हापासून मंत्रिपद मिळाले तेव्हापासून अम्ब्रीशराव यांची नाराजी लपलेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचीही चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होती.