गोंदिया : भारतीय जनता पक्षाने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा आणि देवरी या मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव या जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघातील उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झाला नसून महायुतीत या मतदारसंघाचा तिढा कायम असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यावेळी त्यांनी मुलासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनीही या जागेवर दावा केला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत बडोले यांचा अवघ्या ७०० मतांनी निसटता पराभव झाला होता. हा पराभव भाजप आणि बडोले यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. गेल्या पाच वर्षांत बडोले यांनी या मतदारसंघात चांगलीच मशागत केली. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, विद्यमान आमदाराला डावलणे कठीण जात असल्यामुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील ही एकमेव जागा मागितल्यामुळे भाजपने तूर्त ‘वेट अँड वॉच’चा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. जिल्ह्यात अजित पवार गटाचे अस्तित्व कायम राहावे, याकरिता खासदार प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनीच या जागेवर दावा केला होता. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाच्या वाटाघाटींत हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, यानंतरच येथील उमेदवारीचा निर्णय होईल, असे आता स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीतही रस्सीखेंच
अर्जुनी मोरगाव मतदारसंघावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने दावा केला आहे. गेल्या निवडणुकीत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यामुळे ‘मेरीट’च्या आधारावर ही जागा आपल्याच पक्षाला मिळावी, अशी भूमिका शरद पवार गटाची आहे. काही दिवसांपूर्वी, जनसंवाद यात्रेदरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या जागेवर आपल्याच पक्षाचा उमेदवार असणार, असे सूतोवाच केले होते.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजपच्या माजी नगरसेवकाचे भावी आमदार फलक झळकले
काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दिलीप बनसोड, अजय लांजेवार हे इच्छुक आहेत. ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तशी भावना पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीतही या जागेवरून रस्सीखेच असल्याचे स्पष्ट होते.