दक्षिण गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एका मंदिराच्या ट्रस्टमधून विजय पटेल या भाजपाच्या आदिवासी आमदाराला काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शबरी धाम मंदिरात शबरी माता व प्रभू राम यांच्या मूर्तींजवळ जगदीश गावित व राजेश गामित या भाजपातील ख्रिश्चन नेत्यांसह उभे राहिलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत आदिवासी संघटना यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. या शबरी धाम मंदिराचे प्रमुख स्वामी असीमानंद आहेत. मक्का मशीद, समझोता एक्सप्रेस आणि अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींपैकी एक शबरी धाम मंदिराचे प्रमुख स्वामी असीमानंद होते. त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. असीमानंद हे आरएसएसच्या वनवासी कल्याण परिषदेचे नेतृत्व करतात आणि मंदिरातच राहतात. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपा जिल्हा पंचायत समिती उपाध्यक्ष निर्मला गावित यांचे पती जगदीश गावित आणि राजेश गामित हे दोघेही भाजपातील ख्रिश्चन नेते असून आदिवासी समाजातील आहेत. भाजपा आणि संघाविचारांचा मंदिर ट्रस्ट यांच्यातील वाद आता समोर आला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपा गुजरातमधील आदिवासी समाजापर्यंत पोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गुजरातच्या पूर्वेकडील भागात आदिवासी समाज लोकसंख्येच्या १४ टक्के असून तो उत्तरेपासून दक्षिण गुजरातपर्यंत पसरलेला आहे. 

राज्य निवडणुकांच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवसारी जिल्ह्यातील खुडवेल गावात एका जाहीर सभेत आदिवासी समाज आणि त्यांच्या संस्कृतीचे कौतुक केले होते. याबाबत किशोर गावित म्हणाले की “आदिवासी हिंदूंचे ख्रिश्चन धर्मात होणारे धर्मांतर थांबवणे आणि धर्मांतरित झालेल्या लोकांना परत आणणे हे समितीचे मूळ ध्येय आहे. विजय पटेल यांना चांगलेच माहीत आहे. त्यांनी आमच्यासोबत कामसुद्धा केले आहे. आणि आता मंदिराच्या मूर्तीजवळ ख्रिश्चनांसह भाजपा नेत्यांच्या गटासोबत उभे राहण्याचे त्यांचे कृत्य स्वीकारार्ह नाही”.  ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले की “आमच्या समितीच्या तत्त्वाविरोधात कृत्य केल्यामुळे मंदिराच्या आवारात स्वामी असीमानंद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठराव मंजूर करून विजय पटेल यांची हकालपट्टी करण्यात आली”.

आठ जून रोजी १०० टक्के आदिवासी मतदार असणाऱ्या  मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजय पटेल यांना अचानक समितीमधून काढून टाकण्यात आले. त्याचे कारण, व्हायरल फोटोमध्ये पटेल हे ख्रिश्चन भाजपा नेत्यांसोबत उभे असल्याचे दिसत आहे. सहा जून रोजी सुबीर येथील शबरी धाम मंदिरात साबरीमाता आणि राम यांच्या मूर्तीजवळ हा फोटो काढला होता. या फोटोमुळे पटेल यांना ट्रस्ट समितीवरून काढून टाकण्यात आले.

यावर विजय पटेल यांच्या म्हणण्यानुसार दोन ख्रिश्चन भाजपा नेते माजी विधानसभा अध्यक्ष गणपत वसावा यांच्यासोबत डांग येथे राजकीय दौऱ्यावर गेले होते. आम्ही शबरी धाम येथील मंदिरात गेलो होतो. समितीने घेतलेल्या निर्णयामुळे माझ्या मनात कुठलीही नाराजी नसून त्या निर्णयाचा मी स्वीकार केला आहे. पण असा निर्णय घेण्याआधी माझ्याकडून स्पष्टीकरण मागायला हवे होते.”

गुजरात-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या डांग जिल्ह्यात ४० टक्के ख्रिश्चन लोकसंख्या आहे. विद्यमान काँग्रेस आमदार मंगल गावित यांनी राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे २०२०मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय पटेल डांगमधून निवडून आले. डांगमधील आदिवासी मतदारांनी निवडणुकीत भाजपाच्या ऐवजी काँग्रेसला निवडले आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर निर्माण झालेला हा वाद निवडणुकीत अडचणीचा ठरू शकतो. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gujarats tribal heartland bjp and sangh march out of step pkd