महेश सरलष्कर
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे झंझावाती दौरे सुरू झाले असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाण मांडले आहे. शहरी भागांतील मतांना फटका बसलाच तर, त्याची भरपाई आदिवासीबहुल मतदारसंघातून करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरही आदिवासी भागात सभा घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिवांकडेही विविध विधानसभा मतदारसंघांमधील प्रचाराची जबाबदारी देण्यात आली असून विनोद तावडेही गुजरातमधील प्रचार सक्रिय झाले आहेत. छोटा उदयपूर आणि पंचमहल या आदिवासीबहुल जिल्ह्यामध्ये दौरा करत आहेत. या जिल्ह्यांतील जेतपूर पावी, हलोल, कालोल तसेच, गोध्रा विधानसभा मतदारसंघात तावडे यांनी मंगळवारी सभांमधून मतदारांशी संपर्क साधला.
या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने अनुसूचित जमातीतून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा मुद्दा प्रामुख्याने प्रचारात मांडला आहे. गेल्या ७५ वर्षांत काँग्रेसने आदिवासी समाजाचा राजकारणासाठी वापर केला पण, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले नाही. हे काम भाजपने केले असून हा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे, असा मुद्दा तावडे यांनी मांडला. गुजरातमधील आदिवासी समाजातील लोककलेने प्रेरित कलाकृती, चित्रे अशा विविध वस्तू पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-२० समूहातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना भेट देतात. त्यातून भारताच्या खऱ्या संस्कृतीचे दर्शन होते, असा अस्मितेचा मुद्दा तावडे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा… Gujarat Election 2022: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांना भाजपाचा दणका, आणखी १२ जणांवर निलंबनाची कारवाई
पंचमहल जिल्ह्यामध्ये तावडे यांनी गोध्रा हत्याकांडाचा मुद्दाही जनसंवादामध्ये मांडला. कालोल मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कारसेवक होते, राम मंदिर उभे राहात असताना त्यांना विजयी करण्याला वेगळे महत्त्व आहे. गोध्रा मतदारसंघातील उमेदवाराला विजयी करणे ही सर्व रामभक्तांसाठी अभिमानाची बाब असेल, असे तावडे म्हणाले.
काँग्रेसच्या सत्ताकाळात सातत्याने संचारबंदी व दंगलीमुळे जनता हैराण झाली होती. भाजपच्या सत्ताकाळात संचारबंदी हा शब्दही जनतेला माहिती नाही. पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात देशात शांतता असून गुजरातही दंगल आणि दहशतवादापासून मुक्त झाला आहे, असा दावाही तावडे यांनी केला.