कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावर्षी पुन्हा एकदा साखर कारखानदार विरोधी ऊस उत्पादक आंदोलनाचे शेतकरी नेते असा रंग घेताना दिसत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दंड थोपटले आहेत. मतदारसंघातील बहुतांशी साखर कारखानदारांचे पाठबळ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सरूडकर यांच्या पाठीशी राहण्याची चिन्हे आहेत. या साखरपेरणीच्या राजनीतीवर राजू शेट्टी वारंवार विधाने करताना दिसू लागले असल्याने यंदा पुन्हा उसाच्या फडात निवडणुकीचे रण पेटताना दिसत आहे.
शेतकरी नेते आखाड्यात
हातकणंगलेत गेल्या चार लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेता हा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या नेतृत्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. पैकी सलग दोन वेळा विजय मिळवला होता. गेल्यावेळी ते पराभूत झाले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा मांड ठोकली आहे. त्यांच्या बरोबरीने किसान नौजवान संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, जय शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनीही रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची भाषा करणारे माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांचे नारे थंडावले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावले कि या भागातील मतदार शेतकरी प्राधान्याने शेतकरी नेत्याच्या मागे राहतात हे शेट्टी यांनी दोनदा दाखवून दिले आहे. यामुळे अन्य शेतकरी नेत्यांनी यावेळी आखाड्यात उडी घेतली आहे.
हेही वाचा… कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार
दुसरीकडे या मतदारसंघातील साखर कारखानदारांनी सुरुवातीपासूनच राजू शेट्टी यांची वाट कशी रोखता येईल , अशी भूमिका घेतल्याचे दिसते. त्यातून गेल्या तीन निवडणुकांना ऊस आंदोलनाचा संदर्भ राहिला आहे. याही निवडणुकीत तो पुन्हा जुळताना दिसत आहे. महाविकास आघाडी अंतर्गत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दोनदा चर्चा केली. मशाल चिन्हावर लढण्याच्या शिवसेनेचा आग्रह राहिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शेट्टी यांनी स्वबळावर लोकसभा लढण्याचे ठरवले आहे. त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व वंचितचे बी. सी. पाटील हे प्रमुख तीन उमेदवार आहेत. सरूडकर यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. यामागे साखर कारखानदारांच्या राजकारणाचे संदर्भ असल्याचे स्वाभिमानी कडून सांगितले जात आहे. त्यांच्या आक्षेपांचा रोख हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जात आहे. त्यांच्या राजारामबापू साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या वेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरवाढीच्या मागणीसाठी गव्हाणीत उड्या मारल्या होत्या. त्याचा राग जयंत पाटील यांना होताच. शिवाय, मागील वेळीही जागावाटपात सांगली मतदारसंघ स्वाभिमानीला देऊन तेथून विशाल पाटील यांना लढण्यास भाग पाडले. या राजनीतीचे चाणक्य जयंत पाटील हेच होते. आताही तेच शेट्टी आणि मातोश्री यांचे गणित जमू नये याचे डावपेच इस्लामपुरातून केले गेले याचे रसभरीत वर्णन स्वाभिमानीचे कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत. या सर्व घटनाक्रमामागे साखर कारखानदारांचे लोकसभा निवडणुकीचे राजकारण असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच काय राजू शेट्टी यांनी तर माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संदर्भासह यामागील धागेदोरे कसे आहेत याची उकल करून दाखवली आहे.
साखरेची मतपेरणी
ठाकरे सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर हे शिराळा तालुक्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे गेले २५ वर्षे उपाध्यक्ष आहेत. संचालक मंडळात पाटील यांना मानणारे पाच – सहा संचालक हमखास असतात. या कारखान्यात सत्तेचे निम्मे वाटेकरी म्हणून पाटील यांच्याकडे पाहिले जाते. साहजिकच विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक हेआघाडी धर्म म्हणून पाटील यांच्या प्रचारात दिसतील. याच तालुक्यातील भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे सध्या शरद पवार गटात असून त्यांच्या नेतृत्वाखाली निनाईदेवी साखर कारखाना चालतो. वाळवा तालुक्यातील राजारामबापू कारखान्याचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे तर सरूडकर यांना विजयी करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोल्हापूर काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. डॉ. डी. वाय. पाटील व बाबासाहेब पाटील सरुडकर हे मावस भाऊ आहेत. सतेज – सत्यजित हे दोघेही अत्यंत जवळच्या नात्यातील आहेत. चर्चेवेळी शेट्टी यांनी प्रतिसाद न दिल्याचा राग सतेज पाटील यांना असून उघडपणे शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतील असे दिसतेआहे. शेट्टी यांच्या सततच्या ऊस दर आंदोलनामुळे साखर कारखानदारांची भलतीच कोंडी होत असते. परिणामी कारखान्यांचे अर्थकारण, गाळप हंगाम लांबणे, त्यामध्ये अडचणी येणे अशा अनेक अंगानी होत असतो. त्यातुन समविचारी धोरणाचा आधार घेत साखर कारखानदारांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. शेट्टी नकोत या समान मुद्द्यावरून जवाहर कारखान्याचे नेते आमदार प्रकाश आवाडे, शरद कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांची कुमक शेट्टी यांना विरोध म्हणून काम करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. शिवाय वारणा कारखान्यात विरोधात सातत्याने राजू शेट्टी आंदोलन करत असल्याने या कारखान्याचे नेते विनय कोरे यांनाही साखर कारखानदारांच्या कंपूत घेण्याच्या हालचाली आहेत. या मार्गाने शेट्टी यांना शह देण्याच्या हालचाली सुरू आहे.
हेही वाचा… LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा
षडयंत्र मोडणार – शेट्टी
या घडामोडींचा सुगावा शेट्टी यांना लागला आहे. त्यातूनच राजू शेट्टी यांनी माझ्या विरोधात साखर कारखानदारांनी षडयंत्र रचले आहे. सत्यजित पाटील सरूडकर यांचे वडील एका कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. त्याआधारे सत्यजित पाटील यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवून माझ्या सारख्या शेतकरी नेत्याच्या विरोधात संघटित हालचाली सुरु आहेत. पण काही झाले तरी ऊस उत्पादक शेतकरी,सामान्य शेतकरी, सामान्य जनतेच्या पाठबळावर लोकसभा निवडणुकीत विजय शक्य आहे, असा विश्वास राजू शेट्टी व्यक्त करतात.
साखर कारखानदार शत्रू नाहीत – सत्यजित पाटील
राजू शेट्टी यांचा मुद्दा माजी आमदार सत्यजित पाटील यांनी खोडून काढला आहे. मी चार विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आलो आहे. मी कोणत्याही सहकारी संस्थेचा साधा संचालकही नाही. हाडाचा शेतकरी आहे. अशावेळी शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे. साखर कारखानदारी नसती तर महाराष्ट्राचा विकास झाला नसता. कारखानदार हे काही समाजाचे शत्रू नाहीत. शेट्टी यांना देखील आम्ही शत्रू मानत नाही. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असल्याने या निवडणुकीत मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उतरलो आहे, असे प्रत्युत्तर पाटील यांनी दिले आहे.